भयंकर अपघात ; एसटी-दुचाकीच्या धडकेत तीन युवक जागीच ठार…
या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. बसच्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.

सातारा : साताऱ्यातील लोणंद-निरा रोडवर लोणंद पासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी आणि मोटरसायकलच्या धडकेत मोटरसायकल वरील तीन युवक जागीच ठार झाले आहेत. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे खु ॥ तालुका पुरंदर जि. पुणे येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मंगळवेढ्याहून पुण्याकडे निघालेली एसटी आणि निरेकडून लोणंदकडे निघालेली मोटरसायकल यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये मोटरसायकल वरील अनिल नामदेव थोपटे -गायकवाड (वय 25), पोपट अर्जुन थोपटे -गायकवाड (वय 23), ओंकार संजय थोपटे-गायकवाड (वय 22, रा . पिंपरे खुर्द ता . पुरंदर जि . पुणे) तीनही युवक जागीच ठार झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस सहायक निरीक्षक गणेश माने यांना माहिती मिळताच त्यांचे सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील वाहने बाजूला करून तीनही मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले. या अपघातामुळे काही वेळासाठी विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली असून या गुन्ह्याची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. बसच्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.
हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी अपगातात ठार झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची माहिती पिंपरे खुर्द गावाला समजताच गावावर शोककळा पसरली. नातेवाईक रुग्णालयामध्ये येईपर्यंत मृतदेह ठेवण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
