पवार कुटुंबात पुन्हा लगीनघाई, युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, जाणून घ्या होणाऱ्या पत्नीबद्दल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवारांच्या नातीच्या युगेंद्र पवार यांचा तनिष्का हिच्याशी साखरपुडा पार पडला. सुप्रिया सुळे यांनी या आनंदाच्या बातमीची सोशल मीडियावर घोषणा केली. या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. याआधी जय पवार यांचाही साखरपुडा झाला होता. शरद पवारांनी आधीच युगेंद्रला लवकर विवाह करण्याचा इशारा दिला होता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा १० एप्रिल रोजी पार पडला होता. यानंतर आता पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. जय पवार यांच्यानंतर त्यांचे चुलत बंधू, शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचाही नुकताच साखरपुडा पार पडला. सुप्रिया सुळे यांनी या साखरपुड्याची माहिती दिली आहे.
सुप्रिया सुळेंची पोस्ट
सुप्रिया सुळे यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. “मला ही आनंदाची बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे की माझा भाचा युगेंद्र आणि आमची लाडकी तनिष्का यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांना आयुष्यभर प्रेम, आनंद आणि ते आयुष्यभर एकत्र राहो हीच सदिच्छा. तनिष्काचे कुटुंबात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे”, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी युगेंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र आणि तनिष्काचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. यातील एका फोटोत युगेंद्र आणि तनिष्का फिरताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत तनिष्का हातातल्या रिंगचा फोटो दाखवताना दिसत आहे. सध्या या दोन्हीही फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा सोहळा
दरम्यान युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या होत्या. “आता किती दिवस एकट्याचेच अभिनंदन करायचे, आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. आता फार लांबवू नका,” असे म्हणत त्यांनी युगेंद्र पवारांना लवकरच विवाहबंधनात अडकण्याची सूचना केली होती. त्यांच्या या शुभेच्छांनंतर आता युगेंद्र पवारांनी साखरपुडा उरकला आहे. हा साखरपुडा सोहळा कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला.
पवार कुटुंबात एकाच वर्षी दोन विवाहसोहळे
युगेंद्र पवारांच्या साखरपुड्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, परंतु त्यांची होणारी पत्नी कोण आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. यावर आता अखेर पडदा पडला आहे. तनिष्का असे युगेंद्र पवारांच्या पत्नीचे नाव आहे. त्या नेमकं काय करतात, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता पवार कुटुंबात एकाच वर्षी दोन विवाहसोहळे पार पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
