EC hearing on NCP | राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद, काय-काय घडलं?
राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. निवडणूक आयोगातील आजची सुनावणी पार पडल्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली. तर अजित पवार यांच्या गटाकडून खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली| 20 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: या सुनावणीला हजर होते. या सुनावणीवेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवर आक्षेप घेण्यात आला. अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादानंतर शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाने त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या शुक्रवारी 24 नोव्हेंबरला होईल, असं जाहीर करण्यात आलं. या आगामी सुनावणीला जास्त महत्त्व असणार आहे. कारण दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. याआधीदेखील दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी खडाजंगी झालेली बघायला मिळाली आहे.
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली. “माझा युक्तीवाद संपला आहे. आता आमच्याबाजूने वकील देवदत्त कामत यांनी युक्तीवाद सुरू केला आहे. हजारो कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर ठेवले आहे. बनावट कागदपत्रांची 24 वर्गवारी तयार केली आहे. ज्यांची प्रतिज्ञापत्र जमा केली आहेत, त्यातील काही शहरात राहत नाहीत, काही विमा एजंट आहेत”, असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
‘आमची गुन्हा दाखल करण्याची मागणी’
“अजित पवार गटाने 26 ॲाक्टोबरला पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र दिले. पण ते बनावट असल्याचं आम्ही सांगितलं. हे लाजिरवाणे काम असल्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देऊ नये. आम्ही फक्त 9 हजार सॅम्पल दिले आहेत. मॅजिस्ट्रेट समोर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही केली आहे”, अशी प्रतिक्रिया अभिषेक मनुसिंघवी यांनी दिली.
‘आजच्या सुनावणीत वेळकाढूपणा’, अजित पवार गटाची प्रतिक्रिया
दरम्यान, सुनावणीनंतर अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडण्यात आले. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. आजच्या सुनावणीत वेळकाढूपणा करण्यात आला”, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. “अजित दादा सुनावणीला येणार असं आम्ही कधी म्हटलं नव्हतं”, असंही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.