Sharad Pawar : मोदींनी निवृत्ती घेतली पाहिजे का? शरद पवार यांनी दिलं एका वाक्यात उत्तर

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन केले. मोदींच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांवर त्यांनी थोडक्यात उत्तर दिले. महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंचनामे त्वरित करण्याचे आवाहन केले.

Sharad Pawar : मोदींनी निवृत्ती घेतली पाहिजे का? शरद पवार यांनी दिलं एका वाक्यात उत्तर
मोदींच्या निवृत्ती बद्दल काय म्हणाले शरद पवार ?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 18, 2025 | 11:29 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल वाढदिवस झाला. 75 वा वाढदिवस हा साहजिकच कोणाच्याही आयुष्यात महत्वाचा असतो. पंतप्रधानांनी 75 व्या वर्षांत पदार्पण केलं, मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. मी त्यांना पत्र लिहीलं, ट्विटही केलं. राजकारणामध्ये आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत, त्यामुळे अशा प्रसंगी आम्ही कोणतंही राजकारण मध्ये आणत नाही. राजकारण मध्ये न आणता सभ्य आणि सुस्कृंतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे, त्या दृष्टीने देशातील आणि देशाबाहेरच्या अनेकांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या, जे योग्यच आहे. माझा 75 वा वाढदिवस होता, तेव्हा मोदी स्वत: आले, तिथे त्यांनी राजकारण आणलं नाही आणि आता आम्हीही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले.

मी थांबलो नाही, त्यामुळे..

कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले, मात्र 75 व्या वर्षानंतर संविधानिक पदावर थांबवे की नाही यावरून एका पत्रकाराने पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्कील स्वरात एका वाक्यात उत्तर दिलं.  मी थांबलो नाही, त्यामुळे मला बोलायचा अधिकार नाही, असं शरद पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.मी आता 85 वर्षांचा आहे, 10 वर्ष झाली, असंही पवार पुढे म्हणाले. मोदींच्या निवृत्तीवरून सतत सुरू असलेल्या चर्चांवर पवारांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिलं.

काल मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप, महायुती नेत्यांकडून मोठमोठ्या जाहिराती आल्या होत्या, त्यावरही पवार यांनी भाष्य केलं. ज्या जाहिराती आल्या, त्याचा वर्तमानपत्रांनाआनंद असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या जाहिरीत दिल्या असतील, तो त्यांचा प्रश्न आहे, असंही पवारांनी नमूद केलं.

मोदींच्या निवृ्त्तीवरून बऱ्याच काळापासून उलटसुलट चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं. जेव्हा ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणत्याही नेत्यास शाल दिली जाते, तेव्हा त्याचा एक अर्थ असतो. त्याचा अर्थ म्हणजे त्याचे आता वय झाले आहे. तुम्ही इतरांना संधी दिली पाहिजे,असं त्यांनी म्हटलं होतं. विरोधकांन तोच मुद्दा उचलून धरत मोदींच्या निवृत्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.

मुख्यमंत्र्यांनी पंचनामे अतिवृष्टीकडे लक्ष द्यावे

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावासमुळे नुकसान झाले असून ओला दुष्काळ आहे. अनेक जागी अतिवृष्टी झाली,शेतीचं नुकसान झालं. जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन उद्ध्वस्त झालं. सरकार पंचनामे कधी करतं, मदत कधी पोहोचते ते बघूया, देवाभाऊ ( मुख्यमंत्री फडणवीस) यांनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं, असंही शरद पवारांनी सुनावलं