‘आम्ही महायुतीत रहायचं की नाही ते तरी सांगा?’, शिंदे गटाच्या नेत्याचा संताप अनावर; थेट नेत्यांनाच सवाल
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने भाजप नेत्यांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीवरुन संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते आपल्या वडिलांवर खोचक टीका करत आहेत. त्यामुळे आपण महायुतीत रहायचं की नाही? असा थेट सवालच या नेत्याने केला आहे.

राजकारणात अपमानामुळे काय घडू शकतं हे आपल्याला चांगलं ठावूक आहे. अपमानामुळे महाभारतासारखं मोठं युद्ध घडलं आहे. त्यामुळे आजच्या राजकारणात अपमानाचा बदला तितक्याच तिव्रतेने घेतला जाताना दिसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांमधील घडामोडी तर तेच सांगत आहेत. पाच वर्षांपूर्वी शिवसेना आणि भाजपची महायुती तुटली. यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षांनी कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे ऐतिहासिक ठरलं. पण आता या इतिहासानंतर आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये कुरबुरी आता वाढताना दिसत आहेत. शिवसेनेच्या एका दिग्गज नेत्याने तर या कुरबुरींना कंटाळून आम्ही महायुतीत रहायचं की नाही ते तरी सांगा? असा थेट सवालच केला आहे. हा नेता म्हणजे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ. अभिजीत अडसूळ यांनी भाजपच्या तिकीटावर लढलेल्या माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या टीकेवरुन महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला होता. मात्र तो शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नाही. शिवसेना दोन राज्यपाल पद देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला दोन वर्ष झाली”, असं अभिजीत अडसूळ म्हणाले. “आमदार रवी राणा हे वाचाळ बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबध नाहीत. रवी राणा महायुतीत खडा टाकण्याचं काम करत आहेत. शिवसनेच्या नेत्याबाबत आर्वाच्च बोलणं योग्य नाही. खोटी प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केला. जनतेने त्यांना जागा दाखवली”, अशी टीका अभिजीत अडशूल यांनी केली.
‘राणांना महायुतीतून बाहेर काढा’
“आनंदराव अडसूळ हे महायुतीचे नेते आहेत. आमच्या नेत्याबाबत अशी भाषा वापरली जात असेल तर युतीत राहायचं की नाही? हाही विचार करावा लागेल. रवी राणांचा इतिहास पाहा. सत्तेत जो पक्ष असतो त्या पक्षाचे नेते यांचे देव असतात. बच्चू कडू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेले आहेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा. अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का हे तरी सांगा?”, असा थेट सवालच अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.
‘…तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल’
“ब्लॅकमेलिंग करणं हे आमच्या रक्तात नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकावलं. मात्र आमच्या नेत्याबद्दल बोलवून आमचा स्वाभिमान दुखावला जात असेल तर नक्कीच याचा विचार केला जाईल. महायुतीतील नेत्यांवर छपरी आमदार अपमानकारक बोलत असतील तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल,” असा इशारा अभिजीत अडसूळ यांनी दिला.
