फालतू कोण आहे ते जनतेने ठरवलंय; महेंद्र थोरवेंचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला सडेतोड उत्तर
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी कोणत्याही फालतू माणसाला युतीबाबत बोलण्याचा अधिकार असे म्हटले होते. आता त्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

कर्जतमधल्या कोणत्याही फालतू माणसाला युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले होते. त्यावर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच महायुतीशी गद्दारी करण्याचे काम सुधाकर घारे यांनी केलेले आहे असे म्हणत महेंद्र थोरवे यांनी टीका केली.
“राज्यात आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना ही महायुती अभेद्य आहे. आम्ही उठाव केल्यानंतर राष्ट्रवादी पुढच्या सहा महिन्यांनी आमच्याबरोबर आलेली आहेत. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि वरिष्ठ पातळीवर हे तिन्ही नेते निर्णय घेणार आहेत ते मला मान्य आहे. हा महाराष्ट्राच्या लेव्हलला असणारा विषय आहे असे म्हटले आहे. परंतू कर्जत मतदारसंघांमध्ये आपल्या सर्वांना त्या गोष्टीची कल्पना आहे. सुनील तटकरे यांच्या आशीर्वादानेच सुधाकर घारे हा राष्ट्रवादीत अपक्ष उमेदवार विधानसभेला उभा राहिलेला होता. आपण ते साऱ्यांनी पाहिलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये अलायन्स असताना पण महायुतीशी गद्दारी करण्याचे काम सुधाकर घारे यांनी केलेले आहे आणि तो आता राष्ट्रवादीत येऊन परत पवित्र झालेला आहे. जरी तो कितीही असं म्हणत असेल तरी आमची युती राष्ट्रवादीसोबत राहणार नाही. आमची युती भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना ही अभेद्य युती आहे. आम्ही जिल्ह्यात तिने आमदार एकत्रितपणे करणार आहोत” असे महेंद्र थोरवे म्हणाले.
वाचा: धक्कादायक! प्रशिक्षकानेच व्हायरल केला कुस्तीपटू विद्यार्थाचा विवस्त्र व्हिडीओ, प्रकरण पोलिसात
पुढे महेंद्र थोरवे म्हणाले की, “सुधाकर घारे उबाटा शी युती करेल, शेकाप शी युती करेल, अजून कोणाशी करेल त्याला जे काय करायचंय ते करेल आणि त्याचा आमच्याशी काही संबंध राहणार नाही. आमची पारंपारिक लढाई ही राष्ट्रवादीशी आहे. आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे नगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. फालतू कोण आहे हे या मतदारसंघाच्या जनतेने ठरवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही कौल मिळालेला आहे त्या कौलावरून समजून जावे की फालतू माणूस कोण आहे तो.”
ॲड. तुषांत अरडे यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात त्यांच्या पत्नी किशोरी अरडे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांवरदेखील महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अरडे वकील कोण आहेत हे मी ओळखत नाही, त्यांना मी कधी पाहिले देखील नाही.” मात्र, पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अरडे यांनी अनेक खोट्या अॅट्रॉसिटी केसेस दाखल केल्या असून त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे, असा दावा थोरवे यांनी केला आहे. तसेच, “सोशल मीडियावरून माझी बदनामी करण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे ” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
