Sanjay Raut : गिरीश महाजन हे भाजपचे दलाल, संजय राऊतांचे टीकास्त्र
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री गिरीश महजान यांच्यावर सडकून टीका केली आहे. पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत. गिरीश महाजन यांना त्यांची भाषाच घेवून बुडणार आहे. ते मराठी द्रोही, महाराष्ट्र दोही आहेत, अशा शब्दांत राऊतांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

टेंडरबाजीतून, खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे हे भाजपचं काम. आणि त्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत, त्यापैकी एक म्हणजे गिरीश महाजन आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही बोलावं असं वाटत नाही. महाराष्ट्रातील सर्व भ्रष्ट, राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून हा आत्ताच भाजप दिसतोय, त्यातील हे महाशय आहेत. एकेकाळी भाजप हा पवित्र लोकांचा पक्ष होता, आज या पक्षाची सूत्र दलाल, भ्रष्ट, ठेकेदार यांच्याकडे आहे आणि हे लोक आमचा पक्ष संपवायला निघाले आहेत. हे लोक बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठं आहे असा खडा सवाल राऊतांनी विचारला.
महाजन एक नंबरचे डरपोक
पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिला दलाल गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल. मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकश्या सुरू झाल्या, त्यावेळी ते (महाजन) पक्ष बदलायला तयार होते, असा मोठा गौप्यस्फोटही राऊतांनी केला. मी राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत अशी टीकाही राऊतांनी केली.
तुमच्या 10 पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही..
प्रत्येकाची एक वेळ येतेच. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही आज वापरताय, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही राजकारणात कोण होतात? ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, त्यांचीच शिवसेना संपवण्याची भाषा तुम्ही वापरताय, लाज कशी वाटत नाही? असा सवाल विचारत गिरीश महाजन जे बोलातता, ती भाषाच त्यांना, पक्षाला घेऊन बुडणार असे टीकास्त्र राऊतांनी सोडलं.
शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आत्तापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले, त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शहांनी शिवसेना संपवण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण गिरीश महाजन यांच्या 10 पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही असा हल्ला राऊतांनी चढवला.
योग्यवेळी सांगू
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. सुनील प्रभु आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू असेल तरी ती समोर कशाला येईल? योग्य वेळी ती सांगू ना? असा सवालच त्यांनी केला.
बैठकीला जाणार
यावेळी संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरही भाष्य केलं. काही विरोधी पक्षातील खासदार एकत्र भेटणार आहेत. संसदेच विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी जो ड्राफ्ट केला आहे, त्याच्या मंजुरीसाठी ही बैठक आहे. मीही या बैठकीला जाणार आहे. भारताच्या बाजूने एकही राष्ट्र उभ राहायला तयार नाही. त्याच कारण नरेंद्र मोदी आणि भाजप आहेत. नेपाळ देखील आपल्या बाजूने उभे राहिले नाही, असं राऊत म्हणाले.
भारताची अवस्था बिकट
भारताला जी-20 परिषदेचं निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भारताची अवस्था जगात अत्यंत बिकट झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीच उभ राहिल नाही. भारताला जगात एकही मित्र देश नाही. खासदार परदेशात जाऊन गाणी गात आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
