Sanjay Raut : देशात आणि राज्यात D कंपनीचं राज्य सुरू – संजय राऊत कडाडले
शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनी, संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. त्यांनी शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि पक्षाच्या विरोधकांनी केलेल्या अडथळ्यांचा उल्लेख केला. राऊत यांनी देशात आणि राज्यात "डी कंपनी"चे राज्य असल्याचा आरोप केला, तर शिवसेनेला एकमेव मर्दांचा पक्ष म्हणून वर्णन केले. त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या लोकांवरही टीका केली आणि शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीचा विश्वास व्यक्त केला.

शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन असून त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधाताना पक्षाच्या इतक्या वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. बाळासाहेब ठाकऱ्यांनी हा पक्ष इतका पुढे नेला, की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला, न्याययंत्रणेला हाताशी धरून एखाद्या हिटलप्रमाणे या पक्षावरती घाव घातला अशी टीका राऊतांनी केली. तसेच सध्या देशात आणि राज्यात D कंपनीचं राज्य सुरू आहे अशी शब्दांत त्यांनी भाजपावर कडाडून हल्ला चढवला.
देशामध्ये D कंपनीचं राज्य सुरू
आज देशामध्ये D कंपनीचं राज्य सुरू आहे. भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे D , दिल्लीमध्ये डरपोकी लोकांचं राज्य सुरू आहे. ती D कंपनी आहे आणि महाराष्ट्रमध्ये खरोखर D कंपनी आहे, त्यांचं राज्य सुरू आहे. दाऊद इब्राहिमपासून इक्बाल मिर्चीपर्यंत असे अनेक गुंड, पुंड , झुंड आणि त्यांचे हस्तक, देशद्रोही शक्ति यांना घेऊन ही D कंपनी महाराष्ट्रात राज्य करते आहे, म्हणून दोन्ही ठिकाणी D कंपनीचं राज्य आहे. एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद आणि एका ठिकाणी डरपोक.. या दोन D विरुद्ध शिवसेना हाँ एकमेव पक्ष ताकदीने लढतोय आणि छातीवर वार झेलतोय आणि यापुढेही लढत राहील असं राऊत म्हणाले. काही लोक पाठीवर वार करून निघून गेले, अशा शब्दांत त्यांनी शिंदेवर आणि शिवसेना सोडून जाणाऱ्यांवर निशाणा साधला.
शिवसेनेच्या प्रवासात अनेकदा संघर्ष, अडथळे, संकटं या पक्षाच्या जीवनामध्ये आली. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावं लागलं, सुरूवातीच्या काळात स्वत: शिवसेनाप्रमुखांना तुरूंगावास भोगावा लागला. आणि हे सर्व मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी मा. शिवसेनाप्रमुखांनी सहन केलं आणि पुढे गेले. मा. बाळासाहेब ठाकऱ्यांनी हा पक्ष इतका पुढे नेला, की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी, न्याययंत्रणेला हाताशी धरून एखाद्या हिटलप्रमाणे या पक्षावरती घाव घातला. पण असे असंख्य घाव पचवून शिवसेना आज 59 व्या वर्षात आली आहे. असे अनेक घाव आम्ही यापुढेही पचवू, तरीही शिवसेनेची वाटचाल पुढेही चालूच राहील.
या संपूर्ण काळात अनेक नवे लोक आले, आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले, तरीही हा पक्ष पुढे नेण्याचं धैर्य आणि कसब हे मा. बाळासाहेब यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलं. शिवसेना ही विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आहे, आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली, तेव्हा आम्ही सत्तेत असतानाही चांगलं काम करून दाखवलं. पण सत्ताधाऱ्यांना शिवसेनेचं बय कायम वाटत आलं, आणि ते वाटायलाच हवं अशा प्रकारे या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केली असे संजय राऊत म्हणाले.
जे सोबत येतील त्यांना घेऊ, नाहीतर एकाकी लढू
महाविकास आघाडीने मजबूतपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, ही अनेकांची भूमिका आहे. आम्ही एकत्रच आहोत, पण एकत्र रहात असतानाही शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही. मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा, अन्यायाविरोधात लढण्याचा तो विचार असेल, शिवसेनेची ताकद हीव विचारप्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे. शिवसेना सत्तेसाठी कधीही कोणापुढे झुकली नाही, वाकलीनाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाहीत. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही , हा तर मर्दांचा महासागर आहे, असे राऊत म्हणाले.
