
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं असून कदम यांनी कालही त्यांच्या विधानाची पुनरावृत्ती सुरूच ठेवली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांनी काल पुन्हा विविध आरोप केले. तसेच कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आरोपांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मा. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर हे जी विटंबना करत आहेत, त्याची जबर किंमत रामदस कदम यांना मोजावी लागेल असा इशाराच राऊतांनी दिला.
काय म्हणाले राऊत ?
दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवण्यासा शिवसेनेतील लोकांचा सातत्याने विरोध होता, एक म्हणजे रामदास कदम आणि दुसऱ्या नीलम गोऱ्हे.नीलम गोऱ्हेंचं पक्षातलं योगदान काय हा प्रश्न कायम विचारला गेला. आणि रामदास कदम यांना आमदार, मंत्री म्हणून इतके वर्षं संधी मिळाली आहे, त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवायचं , असे प्रश्न उद्धव ठाकरे यांना पक्षातून विचारले गेले. तरीही उद्धव ठाकरे हे दयाबुद्धीचे असल्याने त्यांनी 2 वेळा त्यांना (रामदास कदम), 12 वर्ष विधानपरिषदेवर पाठवलं. अशा माणसाने ठाकरे कुटुंबाप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे. पण ते गरळ ओकत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर हे लोकं जी विटंबना करत आहेत, त्याची जबर किंमत रामदस कदम यांना मोजावी लागेल.
लाज वाटली पाहिजे यांना..
ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल, कायदेशीर असेल, पब्लिक असेल, नियतीची असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात तुम्ही अशी विधानं करत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ते जो संपूर्ण घटनाक्रम सांगत आहेत, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. शेवटचा जो क्रिटिकल काळ होता, मी तिथे शेवटच्या क्षणापर्यंत होतो. हे लोकं कुठे होते ? कोणीही नव्हतं तिथे. आम्ही मोजकी लोकं होतं तिथे, त्यामुळे तिथे काय परिस्थिती होती, या लोकांची काय अवस्था होती ते पूरेपूर माहीत आहे.आणि तुम्ही आता याचा याप्रकारे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मजल गेली.तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावीच लागेल असे राऊतांनी पुन्हा सुनावलं. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं. फक्त टाळ्या मिळवण्यासाठी वागले, पण त्यांना टाळ्या मिळाल्या नाही, महाराष्ट्र थुंकतोय त्यांच्यावर अश शब्दांत राऊत यांनी कदम यांच्यावर हल्ला चढवला.