शक्तीपीठ महामार्गासाठीचे 10 हजार कोटी… संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले महाराष्ट्रातील घोटाळ्यांची…
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा महामार्ग साडेतीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंगे आणि इतर तीर्थक्षेत्रे जोडणार आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली असून यासाठी 20 हजार कोटींची तरतूद होणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग, पंढरपूर आणि आंबेजोगाईसह 18 तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. यासाठी 12 जिल्ह्यातील 27 हजार 500 एकराची जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. आता या शक्तीपीठ महामार्गावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची फार कठीण अवस्था आहे. सध्या महाराष्ट्राची लूट सुरु आहे, असे म्हटले. शक्तीपीठ महामार्गासाठीचे १० हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरले जातील, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला.
जगातील कोणत्याही घोटाळ्यांसोबत तुलना नाही
“महाराष्ट्रात जेवढे घोटाळे सुरु आहेत, त्याची तुलना जगातील कोणत्याही घोटाळ्यांसोबत होणार नाही. अत्यंत हाय लेव्हलचा घोटाळा सुरु आहे. १९ दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत समृद्धीचे उद्घटान झाले. इगतपुरी ते आमने या ठिकाणची आजची परिस्थिती पाहा. सर्व ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण आताही या ड्रीम प्रोजेक्टमध्ये ५० टक्के घोटाळा आहे. या ड्रीम प्रोजेक्टचा अर्धा पैसा निवडणुकीत मत विकत घेण्यासाठी, आमदार खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी हा सर्व पैसा ठेकेदारांकडून बाहेर आला आणि तो खर्च झाला”, असे संजय राऊत म्हणाले.
फक्त ठेकेदाराला दोषी धरुन चालणार नाही
“आता हे शक्तीपीठ महामार्गाच्या मागे लागले आहेत. यासाठी २० हजार कोटी मंजूर झाले आहेत. त्यातले किमान १० हजार कोटी बाहेर येतील. जसे MMRDA चे ३ हजार कोटी आले आणि हे पैसे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीत ठेकेदारांकडून वापरले जातील. हे सर्व ड्रीम प्रोजेक्ट ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी चालले आहेत. महाराष्ट्राला याचा किती फायदा आहे की नाही, हा पुढचा प्रश्न आहे. सर्वात आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला ब्लॅक मनीतून खरेदी विक्री सुरु करा. समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदाराला दोषी धरुन चालणार नाही. त्या संबंधित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढायला हवं”, अशी मागणी संजय राऊतांनी केली.
महाराष्ट्राची लूट सुरु
“ही सर्व कमिशनबाजी सुरु आहे. माळेगाव कारखान्याला ५०० कोटी देणार आहेत, कुठून आणणार ५०० कोटी, एका कारखान्याला तुम्ही ५०० कोटी देणार. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे २० दिवस गावात खुर्ची टाकून बसतात. काय चाललंय या महाराष्ट्रात, फार कठीण अवस्था आहे. महाराष्ट्राची लूट सुरु आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला.
