महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत, हीच विजयादशमीची विजय गर्जना… दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरेंचा एल्गार
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयादशमीच्या निमित्ताने 'महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल' अशी गर्जना करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा हा सण फारच खास असतो. राज्यात दरवर्षी विविध पक्षांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा खास ठरणार आहे. यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयादशमीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल’ अशी गर्जना करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून विविध विषयांवर भाष्य केले जाते. यंदाच्या मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान आणि जनतेचा आवाज बंदिवान होऊ नये, यासाठी संकल्प करणे हाच खरा विजयादशमीचा विजयोत्सव असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. आज विजयादशमीचा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत. मोदी राज्यात फक्त उत्सवच सुरू असतात. राजा उत्सवात मग्न असतो आणि प्रजा मात्र तळमळत असते. त्यामुळे आजचा दसऱ्याचा उत्सव तरी वेगळा आहे काय? असा टोला लगावला आहे.
राजा धर्माचा आधार घेतो
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, पहलगाम हल्ल्यातील बळींचे कुटुंबीय, लडाखमधील सोनम वांगचुक यांचा प्रश्न, मणिपूरमधील अशांतता आणि बिहारमधील मतचोरी यांसारख्या गंभीर प्रश्नांवरुन सामनातून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. देशातील मध्यमवर्गाच्या मनामध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. तो असंतोष जातीधर्माच्या अंगारा-धुपाऱ्यात विरघळून टाकण्याचे कौशल्य सध्याच्या राज्यकर्त्यांनी जाणले आहे. जनतेच्या मनात असंतोषाचा वणवा पेटत असेल व जनता ऐकण्याच्या मनःस्थितीत नसेल तर राजा धर्माचा आधार घेतो, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.
अर्धा देश गौतम अदानींना स्वस्तात दिला
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला महत्त्व देऊन पहलगाम हल्ल्यातील भारतीय बळींच्या बदल्याकडे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या घोषणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रामाने रावणावर किंवा पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो ‘व्होट चोरी’ किंवा निवडणूक आयोगाच्या आधारावर नव्हता, असेही सांगत सत्ताधाऱ्यांच्या नकली हिंदुत्वावर प्रहार करण्यात आला आहे. देशात बेरोजगारीचा रावण थैमान घालत आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत मरण पावला आहे आणि अर्धा देश गौतम अदानींना स्वस्तात दिला गेला आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
राष्ट्र परकीयांकडूनच गुलाम बनते असे नाही, तर स्वकीयांच्या हुकूमशाहीमुळेही आपले राष्ट्र गुलाम बनते व राष्ट्रातील लेखक, विचारवंत, माजी सैनिक लाचार बनतात तेव्हा या गुलामीच्या बेड्या तुटता तुटत नाहीत. या बेड्या तोडण्यासाठी संघर्षाचा एल्गार करणे हीच विजयादशमीची विजय गर्जना आहे, असे आवाहन अग्रलेखातून करण्यात आले आहे.
