अलिशान गाड्या आणि हिरे… शिंदे गटाच्या उमेदवाराच्या संपत्तीत 30 कोटीने वाढ
राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर आता निवडणुकीचं समीकरणही बदललं आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता. आज अजित पवार हेच बारणे यांचा अर्ज भरण्यासाठी आले होते. बारणे पुन्हा एकदा मावळमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याशी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता पुढचे टप्पे सुरू झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. मावळमध्ये चौथ्या टप्प्यासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सर्वच उमेदवारांनी कंबर कसली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनीही उमेवादारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केलं आहे. या प्रतिज्ञापत्रातून बारणे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 30 कोटींची वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बारणे यांच्याकडे एकूण 114 कोटींची संपत्ती असून ते मावळमधील धनाढ्य उमेदवार ठरले आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बारणे यांनी अर्ज भरला. आज दुपारी 1 वाजता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारणे यांच्या प्रचारार्थ रोड शो देखील केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी 2 लाख मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचं तगडं आव्हान असणार आहे.
अशी वाढली संपत्ती
2019 मध्ये श्रीरंग बारणे कुटुंबीयांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल 82 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली होती. आता मागील पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 30 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये बारणे कुटुंबीयांची संपत्ती 66 कोटी होती. 2019मध्ये त्यांची संपत्ती 82 कोटी झाली. म्हणजे गेल्यावेळी त्यांच्या संपत्तीत 35 कोटींची वाढ झाली होती. यंदा त्यांची संपत्ती 114 कोटी दाखवण्यात आली असून गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 30 कोटींनी वाढ झाली आहे.
अलिशान गाड्या
श्रीरंग बारणे हे मावळमधील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. बारणे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे अलिशान गाड्या आहेत. तसेच हिरे आणि सोन्याचे दागिनेही आहेत, तशी माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. श्रीरंग बारणे हे दहावी नापास आहेत. शेती, बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी आदी व्यवसाय करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.