कारचे दरवाजे झाले लॉक, 6 महिन्यांच्या गर्भवतीचा होरपळून मृत्यू, हतबल नवरा काहीच करू शकला नाही!
सध्या जळगावमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथे एका कारमध्ये सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यानंतर लॉक झालेल्या गाडीतून कसे बाहेर पडावे, असे विचारले जात आहे.

Jalgaon Car Accident : कारमध्ये बसून आरामात प्रवास करणे प्रत्येकालाच आवडते. विशेष म्हणजे आजारी व्यक्ती, वृद्ध महिला किंवा पुरुष यासह गर्भवती महिलांसाठी कारमधील प्रवास हा सोईचा आणि सुखकर मानला जातो. हाच कारचा प्रवास मात्र एका सहा महिन्यांच्या गर्भवतीच्या जीवावर बेतला आहे. जळगाव जिल्ह्यात एक काराने दुभाजकाला धडक दिली. त्यानंतर आग लागली. याच आगीत सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गाडीचे सगळेच दरवाजे लॉक झाल्याने हा दुर्दैवी प्रसंग घडला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे गाडी जळून एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. महाराहून परतताना या महिलेवर काळाने घाला घातला आहे. विशेष म्हणजे पतीच्या समोरच पत्नी जान्हवी मोरे हिचा होरपळून मृत्यू झाला आहे. आरटीओ कारवाईच्या भीतीने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. महामार्गावर गाड्यांची तपासणी केली जात होती. याच पोलिसांना बघून चालक संग्राम मोरे घाबरले. त्यांच्याकडे कार चालवण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांना चुकवण्याच्या नादात त्यांची गाडी महामार्गावरील दुभाजकाला धडकली. या अपघातानंतर इंजिनमधून धुर यायला सुरुवात झाली.
जान्हवी मोरे यांचा होरपळून मृत्यू
ही घटना घडल्यानंतर महामार्गाच्या बाजूला असलेल्या काही लोकानी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीचा काच फोडून संग्राम यांना बाहेर काढले. परंतु गाडीमध्ये खूप धुर झाला. बाहेरच्या लोकांना गाडीमध्ये आणखी एक व्यक्ती आहे, हे दिसलेच नाही. त्यानंतर काही वेळाने गाडीने पेट घेतला आणि यात गाडीत असलेल्या जान्हवी मोरे यांचा होरपळून मृत्यू झाला. जान्वही या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या. संग्राम यांच्या डोळ्यादेखीत त्यांच्या गर्भवती पत्नीचा अंत झाला.
गाडी लॉक झाल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यावी?
गाडी लॉक झाल्यानंतर आतल्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे, हा प्रश्न पडतो. त्यामुळे गाडीमध्ये एखादी धारदार वस्तू असेल तर आतल्या व्यक्तीने गाडीची काच तातडीने फोडावी आणि गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. गाडीच्या समोरच्या विंडोला सगळ्यात आधी हॅमरने किंवा टोकदार वस्तूने फोडण्याचा प्रयत्न करावा. गाडीच्या समोरची काच ही मोठी असते आणि अगदी आरामात यातून बाहेर पडता येऊ शकते. दुसरा पर्याय गाडीची मागची काच आहे. ती काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. गाडीच्या मागे असलेला टायर आणि त्याच्यासोबत असलेली टॉमी किंवा जॅकने काच फोडणं हा पर्याय आहे.
