तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात, बस चालकासह 3 जणांचा मृत्यू
सध्या या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहोळ तालुक्यात ही घटना घडली. यात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

सोलापुरात तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. सध्या या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहोळ तालुक्यात ही घटना घडली असून यात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.
नेमकं काय घडलं?
सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळ ट्रक, मिनीबस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यावेळी ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने राँग साईडला जाऊन मिनी बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मिनी बस थेट पलटी झाली. यामुळे बसमध्ये असलेले प्रवाशी जखमी झाले. या मिनी बसमधील भाविक तुळजापुरात देवदर्शनासाठी जात होते.
या दुर्घटनेत बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
या अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनी बस बाजूला करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत भीषण अपघात, तरुणीचा मृत्यू
तर दुसरीकडे मुंबईत हाजीआली परिसरात मोठा अपघात घडला. या सागरी किनारा मार्गावर झालेल्या अपघातात एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातात मोटर चालवत असलेला 22 वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गार्गी चाटे असे मृत तरुणीचे नाव असून ती प्रभादेवी परिसरात राहात होती. ती मूळची नाशिकच्या गंगापूर येथील रहिवासी आहे. ती दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. संयम साकला या तरुणासह गार्गी प्रभादेवी येथून शनिवारी रात्री उशिरा ‘स्विफ्ट’ मोटरीने मरिन ड्राईव्हच्या दिशेने जात होते. त्यावेळी सागरी किनारा मार्गावरील हाजी अलीच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची गाडी लोखंडी गजांना धडकली आणि पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात गार्गीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्या दोघांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले. मात्र गार्गीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असून संयम याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा ताडदेव पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने अधिक तपास करत आहेत. सध्या अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे
