तानाजी सावंतांना जे मंत्रीपद मिळाले, तेच आश्चर्यकारक; शहाजी बापू पाटलांचे शालजोडे, तुफान फटकेबाजीने सभेत पिकली खसखस

Shahaji Bapu Patil on Tanaji Sawant : सोलापूरमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी बार उडवून दिला. त्यांनी तानाजी सावंत यांना चिमटे काढले तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी सभेत एकच हश्शा पिकवला.

तानाजी सावंतांना जे मंत्रीपद मिळाले, तेच आश्चर्यकारक; शहाजी बापू पाटलांचे शालजोडे, तुफान फटकेबाजीने सभेत पिकली खसखस
शहाजी बापूंची पक्षातीलच नेत्यावर टीका
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 01, 2025 | 11:04 AM

सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांनी तानाजी सावंत यांना चिमटे काढले. तर राज्यातील राजकारणावर भाष्य केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी सभेत एकच हश्शा पिकवला. काय झाडी, काय डोंगर या गुवाहाटीतील त्यांच्या डायलॉगने बापू रात्रीतून राज्यातच नाही तर देशात लोकप्रिय झाले होते. आता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यावरती केलेली टीका राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल

माजी आमदार शहाजी बापू पाटलांचे माजी तानाजी सावंत यांना शालीतून जोडे हाणले. त्यांनी अचानक सावंतांकडे मोर्चा वळवल्याने एकच चर्चा झाली. तानाजी सावंत धाराशिव मधून आमदार आहेत, त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला. तानाजी सावंत हे मोठे शिक्षण संस्था चालवतात. पाच-सहा कारखाने झालेले आहेत. त्यांना आणखी काही कारखाने खरेदी करायचे आहेत.अशा व्यापात ते गुंतल्यामुळे पक्षकार्याकडे त्यांचे कमी लक्ष आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

तानाजी सावंतांना जे मंत्रीपद मिळाले आहेत तेच आश्चर्यकारक आहे, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला. तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात. तानाजी सावंत यांची इंट्री अचानकपणे झाली आणि ते बाजूला पण अगदी अचानकपणे निघून गेले, असे पाटील म्हणाले.

शरद पवार यांच्यावर टीका

शरद पवारांनी आधी धर्माचा संबंध नसल्याचे बोलले होते. मात्र फडणवीस साहेबांनी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी आपले शब्द बदलले आहेत, अशी टीका त्यांनी केली. विजय वडेट्टीवार जे बोलत आहेत ते विनाकारण विरोधाला विरोध करण्याचं काम आहेत. वडेट्टीवारांनी हल्ल्यातील चित्रीकरण पहावे. या दहशतवाद्यांनी निवांतपणे निष्पाप लोकांना मारले आहे. अतिरेक्यांना भीती वाटण्यासारखे तिथे कोणतेही वातावरण नव्हते. गोरगरीब माणसं होती. लहान मुलं होती. महिला होत्या त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे, असे ते म्हणाले.