
बार्शीत जिल्हापरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली आहे. “अशा अनैसर्गिक युती, आघाडी लोकं स्वीकारणार नाहीत. लोकं भाजपच्याच बाजूने राहतील. महायुतीच्या लोकांनी मात्र काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत. महायुतीच्या बाहेर जाऊन स्थानिक आघाडी करताना विचार करायला पाहिजे” असं जयकुमार गोरे म्हणाले.
“भाजप जिल्ह्यातला आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक पक्ष स्वतःच्या अस्तित्वसाठी धडपड करतायत. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी युती, आघाडी होतायत. यावरून भाजप किती मजबूत आहे हे समजतं. महायुतीच्या लोकांनी मात्र काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत. महायुतीच्या बाहेर जाऊन स्थानिक आघाडी करताना विचार करायला पाहिजे. बार्शीत युती काय झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं हे त्यांनाच विचारा” असं जयकुमार गोरे म्हणाले.
लोकं भाजपच्याच बाजूने राहतील
“भाजपचा पराभव एक, दोन, तीन जणांनी एकत्रित येऊन करणे शक्य नाही हे विरोधकांना लक्षात आलं आहे. त्यामुळे पाच-पाच पक्ष एकत्र येतायत. पण अशा अनैसर्गिक युती, आघाडी लोकं स्वीकारणार नाहीतय. लोकं भाजपच्याच बाजूने राहतील. आगामी सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल” असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला.
महापौर भाजपचा नगरसेवक असेल
“सोलापूर महापालिकेच्या गटनेता निवडीसाठी आमची बैठक पार पडली. भाजपकडे 87 नगरसेवक आहेत. अनेक सक्षम चेहरे भाजपकडे आहेत. त्यातील एकाची निवड ही गटनेता म्हणून होईल. महापौर निवड देखील नियमाप्रमाणे होईल. आयोग जे नियम आणि वेळ सांगेल त्याच्या आधीच महापौर निवड होईल. महापौर हा सोलापूरचा नागरिक असेल. भाजपचा नगरसेवक असेल” असं जयकुमार गोरे म्हणाले.
म्हणून विसरून चालणार नाही
“एखाद्या नेत्याचे नातेवाईक पक्षाचे कार्यकर्ते असतील, चांगलं काम करणार असाल तर त्यांचा अवश्य विचार केला पाहिजे. केवळ तो एखाद्या नेत्याचा नातेवाईक आहे म्हणून विसरून चालणार नाही. पण थेट एखाद्याला उमेदवारी देणे हे भाजपच्या संहितेला धरून होणार नाही. शक्यतो आम्ही कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा विचार केलाय” असं जयकुमार गोरे म्हणाले.