माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न.; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

| Updated on: Mar 19, 2024 | 2:55 PM

Sushilkumar Shinde on Praniti Shinde and BJP : राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जातायेत पण... नेमकं काय घडलं? राज्यातील राजकारण आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य, पाहा नेमकं काय म्हणाले...

माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न.; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
Follow us on

सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 19 मार्च 2024 : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अशात काँग्रेसच्या महिला नेत्यालाही भाजपने ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं म्हटलं आहे. सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. भाजपवाले पक्षात प्रवेश करा म्हणण्यातसाठी येतात. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?

सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र प्रणितीने विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे.जी गांधी- नेहरूंची काँग्रेस आहे. त्यामध्येच मी राहील असा विचार तिने केला. काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील. प्रणितीच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या मनात काय आहे ते मी सांगू शकत नाही. भाजपवाले येतात प्रवेशासाठी. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत. प्रणिती देखील स्ट्रॉंग आहे. तिला भाजपसोबत जाणं पटत नाही. लोकांनी तिला तीन वेळेस निवडून दिले म्हणून ते पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं.

मोदींवर टीकास्त्र

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रीय विचारसरणीची भाषा बदललेली आहे. लोकांनी अशा भुलथापा देणारा पंतप्रधान दोन वेळेस स्वीकारला. भाजप फक्त मोदी आणि त्यांची गॅरंटी असे म्हणतात मात्र कसली गॅरेंटी आहे, ते त्यांनाच माहिती आहे. आम्ही पन्नास वर्ष राजकारणात आहोत. कसली गॅरेंटी दिली नाही, जनताच तुम्हाला गॅरेंटी देते. लोक आमच्या बाजून आहेत, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

राज ठाकरे – अमित शाह भेटीवर भाष्य

राज ठाकरे आणि अमित शाह यांची आज दिल्लीत बैठक झाली. यात युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे आणि भाजप युतीवर प्रतिक्रिया दिली. हा इलेक्शन प्रोसेस मधला निरनिराळ्या पार्टीचा चालणारा भाग आहे. त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही. प्रत्येक प्रत्येकाची नीती असते. त्यामुळे भाजप शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करत राहणार आहेत, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.