नांदेडच्या कर्मचाऱ्याचा ‘देशमुखी’ थाट आणि अख्खा महाराष्ट्र ‘घोड्यावर’, वाचा महाराष्ट्रातली आजची चर्चित स्टोरी सविस्तर

हे राहिलं सरकारी काम आणि सरकारी पत्रव्यवहार. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणं तसं स्वाभाविकच.

  • राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड
  • Published On - 20:08 PM, 3 Mar 2021
नांदेडच्या कर्मचाऱ्याचा 'देशमुखी' थाट आणि अख्खा महाराष्ट्र 'घोड्यावर', वाचा महाराष्ट्रातली आजची चर्चित स्टोरी सविस्तर

नांदेड : “मला मणक्याचा त्रास आहे. कार्यालयात गाडीवर येत असल्याने तो त्रास अजून वाढत आहे. त्यामुळे मला घोड्यावरुन कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात यावी”, ही मागणी वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत झाला असाल. कदाचित तुम्ही पुन्हा एकदा वर केली गेलेली मागणी वाचाल. पण हो, ही मागणी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने केली आहे. या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्रच दिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. महत्वाची बाब म्हणजे अनेक सरकारी कार्यालयात सध्या ही मागणी करणाऱ्या पत्राचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.(Special letter from the employee to the District Collector of Nanded)

घोड्यावर येऊ देण्याची विनंती करणारं पत्र!

“नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी असलेले सतीष पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलं आहे. “मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड इथं कार्यारत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टु व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावरुन बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, हि विनंती”, असं पत्र नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिण्यात आलंय.

जिल्हाधिकाऱ्यांपुढे पेच, आरोग्य विभागाची मदत!

आता हे पत्र सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत असल्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनाही या पत्राची दखल घ्यावी लागली. या मागणीवर उत्तर शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मग आरोग्य विभागाचीच मदत घेतली. संबंधित विषय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी, नांदेड यांना कळवला. मग वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनीही संबंधित विषय जाणून घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं.

घोड्यावर प्रवास केल्यास अजून आदळआपट होईल!

“सतिष पंजाबराव देशमुख यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे टु व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी घोडा खरेदी करुन घोड्यावर बसून कार्यालयात येण्याची व कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देण्यासंबंधी विनंती अर्ज केलेला आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. 3 अन्वये विभागप्रमुख अस्थिव्यंगोपचारशास्त्र यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखीन आदळआपट होते. त्यामुळे मणका दबण्याची आणि मणक्यामधील गादी दबण्याची तसेच सरकण्याची संभावना असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा आजार कमी न होता वाढण्याची दाट शक्यता आहे. करीता आपल्या माहिती व योग्य कार्यवाहीस्तव सादर”, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवली.

शेवटी सरकारी कामकाज…

दरम्यान, ज्या व्यक्तीला मणक्याचा त्रास आहे, त्याला गाडीसह घोड्याचाही त्रास होणार, हे जवळपास सर्वांनाच माहिती असेल. पण हे राहिलं सरकारी काम आणि सरकारी पत्रव्यवहार. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणं तसं स्वाभाविकच. मात्र, जेव्हा हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. तेव्हापासून या विषयासंबंधीचा अजून एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल मेसेज

१)घोडा खरेदी करण्यासाठी dept ची घेतलेली परवानगी
२)घोडा हाच प्राणी खरेदी करण्याचे प्रयोजन काय?
३) घोड्याची रंग, उंची, लांबी किती असेल?
४) वन्यजीव विभागाची परवानगी सोबत जोडावी
५) घोड्याने केलेली घाण काढण्यासाठी आपण काय नियोजन केले आहे?
६) घोडा बांधण्यासाठी आपण निवडलेली जागेचा नकाशा, उतारा सोबत जोडावा.
७)जागा मालकाची घेतलेली परवानगी सोबत जोडावी.
८) घोडा हाताळण्यासाठी आपण प्रशिक्षण घेतले आहे का? घेतले असल्यास दाखला सोबत जोडावा
९) घोडा उधळल्यास जबाबदारी कोणाची राहील हे आपल्या अर्जात नमूद केलेले नाही
१०) घोड्याच्या चाऱ्याची आपण काय व्यवस्था केलेली आहे?
११) आपण पुरवण्यात येणारा चाऱ्याची अन्न व औषध विभागामार्फत दररोज तपासणी करून घेणे बंधनकारक राहील.
१२) घोड्यास बांधण्यासाठी शेड बांधण्यासाठी येणारा खर्च आपणास करावा लागेल.
१३) वन्य जीव हाताळणी कायदा अंतर्गत शेड मधील तापमान नियमित ठेवण्यासाठी तेथे AC बसवावा लागेल.
१४) याव्यतिरिक्त वेळोवेळी इकडील कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे आपणास पालन करणे बंधनकारक राहील.
१४) वरील सर्व अटींची पूर्तता कराव्यात किंवा आपली मणक्याचे शस्त्रक्रिया करून घ्यावी.

वरील सर्व प्रकारामुळे सरकारी कामकाजाचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना येत आहे. तसंच या संपूर्ण प्रकारामुळे लोकांची आयती करमणूकही होत आहे. हे वेगळं सांगायला नको.

इतर बातम्या :

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

Video : जान्हवी कपूरच्या पहिल्याच आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Special letter from the employee to the District Collector of Nanded