पासची मुदत संपली म्हणून विद्यार्थ्यासोबत केलं असं काही… जळगावात बस कंडक्टरचा क्रूरपणा उघड
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पाचवीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला एसटी बस कंडक्टरने पासची मुदत संपल्याचे कारण देऊन पावसात रस्त्यावर उतरवले. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. उपसरपंचांनी चौकशीची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. आता एसटी बस कंडक्टरच्या अमानुष आणि बेजबाबदार वागणुकीमुळे एका पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्याला भर पावसात रस्त्यात उतरावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात हा प्रकार घडला. त्याच्या पासची मुदत संपल्याचे कारण देत या विद्यार्थ्याला बसमधून खाली उतरवण्यात आले. यामुळे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
जळगावातील चोपडा तालुक्यातील उनपदेव आणि अडावद गावांदरम्यान हा अमानुष प्रकार घडला. बादल राजाराम बारेला असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. बादल नेहमीप्रमाणे बसमध्ये चढला. त्यानंतर कंडक्टरने त्याला पास आणि तिकिटबद्दल विचारण्यात आले. त्याने त्याचा पास दाखवला. बसचा पास तपासताना त्याची मुदत संपल्याचे लक्षात आले. यानंतर वाहकाने कोणताही विचार न करता त्याला भर रस्त्यात खाली उतरवले. त्यावेळी पाऊस सुरू होता. बसमधून खाली उतरवल्यामुळे या लहानग्या विद्यार्थ्याला भर पावसात दोन ते तीन किलोमीटर पायी चालत आपल्या पाड्यावर पोहोचावे लागले.
उपसरपंचांकडून चौकशीची मागणी
या घटनेची माहिती मिळताच कर्जाणे गावाचे उपसरपंच प्रमोद बारेला आणि बिरसा ब्रिगेड सातपुडाचे अध्यक्ष रामदास पावरा यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. त्यांनी चोपडा येथील आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “कर्तव्य महत्त्वाचे असले तरी माणुसकी त्याहून अधिक महत्त्वाची आहे. एका लहान मुलाला अशा परिस्थितीत एकटे सोडून देणे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषी वाहकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
आगारप्रमुखांचे आश्वासन
या संदर्भात बोलताना आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी सांगितले की, या वाहकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, ती विभागीय पातळीवर पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. एसटी महामंडळासारख्या जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेकडून अशा प्रकारची बेजबाबदार कृती होणे धक्कादायक आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची जलद चौकशी होऊन दोषी वाहकावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
