आता ग्रामपंचायत उपसरपंचांनाही मानधन, 15.72 कोटी रुपये खात्यावर जमा, हसन मुश्रीफांची घोषणा

सरपंचांसोबतच उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले आहे. हे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आलं आहे (Honorarium to Grampanchayat Upsarpanch)

आता ग्रामपंचायत उपसरपंचांनाही मानधन, 15.72 कोटी रुपये खात्यावर जमा, हसन मुश्रीफांची घोषणा

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांसोबतच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होतं. मात्र, उपसरपंचांचा यात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता सरपंचांसोबतच उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे (Honorarium to Grampanchayat Upsarpanch in Maharashtra), अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले, “राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासात महत्त्वाचा सहभाग देणाऱ्या उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन देता आले नव्हते. आता मानधन ऑनलाईन देण्याची कार्यप्रणाली तयार करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उपसरपंचांना एकूण 8 महिन्यांचे एकत्रित मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकुण 15.72 कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत.”

“राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती आहेत. त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 24 हजार 485 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याचं काम सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण केलं जाईल, असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

कुणाला किती मानधन?

2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1000 रुपये, तर 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1500 रुपये आणि 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 2000 रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.

सरपंचांचेही प्रलंबित मानधन वर्ग

दरम्यान, राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित राहिले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना हसन मुश्रीफ यांनी विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच 22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

संबंधित बातम्या :

सरपंच पती, प्रशासक पत्नी, ग्रामपंचायत बरखास्तीवर मुश्रीफ यांचा तोडगा

दत्ता, तुम्हा सर्वांच्या भरवश्यावर करतोय, तुम्ही काळजी घ्या, पुण्यातील सरपंचाला थेट उद्धव ठाकरेंचा कॉल

स्पेशल रिपोर्ट | सरपंच निवडीचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळला

Honorarium to Grampanchayat Upsarpanch in Maharashtra

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *