पाय अधू तरी सपासप ऊस तोडणी करतात, सातपुड्यातील अपंग आदिवासी बंधूंचा संघर्ष
एकीकडे सरकारने मोठा गाजावाजा करत दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली आहे. तर त्यासोबत शासन दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम घेतला आहे. त्यावर कोट्यावधींचा खर्च केला, मात्र या कार्यक्रम घेणाऱ्या समाज कल्याण आणि दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दोघे अपंग बांधव दिसले नाहीत का ? हे फक्त प्रातिनिधीक उदाहरण आहे, असे अनेक दिव्यांग आजही शासकीय मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.

जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नंदुरबार | 6 डिसेंबर 2023 : एकीकडे आपण जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाठ थोपटवून घेत असताना समाजातील अनेक घटकापर्यंत याची फळेच पोहचलेली नाहीत असे दुर्दैवी चित्र आहे. सातपुड्याच्या दुर्गम भाग असलेल्या बिलगाव येथील दोन अपंग भावांचा पोट भरण्यासाठी सुरु असलेला संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. एकीकडे शासन तुमच्या दारी असे सांगत सरकार लोककल्याणाच्या आणाभाका घेत आहे. दुसरीकडे या दोघा ऊस तोड अपंगांच्या मदतीसाठी कोणतीही सरकारी योजना धावून येत नसल्याचा विरोधाभास दिसत आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागातील बिलगाव येथील दोघा अपंग आदिवासी बंधूंना पायांनी अधू असतानाही ऊस तोडणीसाठी उन्हाताणात कष्ठ करावे लागत आहे. त्यांची कच्चीबच्ची सोबत घेऊनच ते ऊस तोडणी करीत असतात. त्यांच्या गावात रोजगाराच्या कोणत्याही सोयी नाहीत. शिक्षणाचा अभाव असल्याने शासकीय योजनेचा त्यांना गंधही नाही. म्हणून कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हे दिव्यांग बंधू ऊस तोडणी करीत आहेत. आपल्या शारीरिक अपंगत्वाचा कुठलाही बाऊ न करता स्वतःच्या जिद्दीवर ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहेत, हेच विशेष आहे.
हातांचा पायासारखा वापर
मिठ्या पावरा आणि जुरदार पावरा या अपंग बंधूंचे शिक्षण गरीबीने झाले नसल्याने त्यांना मराठीही धड बोलता येत नाही. ऊस तोडणीसाठी ते आपले कुटुंब सोबत घेऊनच कोयत्याने ऊस तोडत असतात. त्यांच्याशी टीव्ही 9 प्रतिनिधींनी बातचीत केली असताना त्यांना अपंगांसाठी कोणत्या योजना आहेत का ? याविषयी काहीही माहीती नसल्याचे समजले. पायाने अपंग असले तरी तोंडात ऊस तोडणीचा कोयता धरून आणि दोघे हातांचा वापर चालण्यासाठी करतात. धडधाकट व्यक्तींपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी न पडता त्यांचा जगण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र अविश्रांत संघर्ष सुरु आहे.
राजकीय नेते काय कामाचे ?
एकीकडे सरकार दिव्यांगांसाठी मोठ मोठ्या योजनांची घोषणा करते, त्यांचे सर्वेक्षण करते, मात्र शासकीय यंत्रणांना हे दोघे भाऊ दिसले नाहीत का ? त्यांना गावात ना घरकुल योजनेचा लाभ मिळालाय, ना अपंगांसाठी मिळणारं मानधन किंवा इतर शासकीय योजनांचा लाभही त्यांना मिळत नाहीत? अशा दिव्यांग बांधवांकडे कोणी लक्ष देत नसतील तर आदिवासी समाज आणि जिल्ह्यातील राजकीय नेते काय कामाचे ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते मानलेश मल्लेश जयस्वाल यांनी केला आहे.
