
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या निधनाचे सुतक फिटण्यापूर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहे. हे सर्व भाजपचे प्लॅनिंग आहे, असा दावा सामनातून करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या चितेची आग विझण्याआधीच सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या ही आनंदाची बाब असली, तरी ज्या घाईने आणि गुप्ततेने हा सोहळा झाला, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुतक काय, येते आणि जाते, पण राजकारण थांबवून कसे चालेल? असा उपरोधिक टोला सामनाने लगावला आहे. तसेच सध्याचे राजकारण लई वंगाळ झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुन्हा मनोमीलन होऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अजित पवारांना शरद पवारांविषयी आदर असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले होते. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर यावर शिक्कामोर्तब होणार होते. मात्र, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना हे विलीनीकरण नको होते. हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचाच अजेंडा असून, पवार कुटुंबातील गुंता वाढवून त्यात स्वतःचा स्वार्थ साधण्याचे प्रयत्न सुरु आहे, असा आरोप सामनाने केला आहे.
सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद म्हणजे शोभेचे ठरू नये. अजित पवारांकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते, त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि कामाचा झपाटा सुनेत्रा पवार दाखवू शकतील का? हा प्रश्न आहे. पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ही नौका वादळातून बाहेर काढताना सुनेत्रा पवारांची खरी कसोटी लागणार आहे. या नव्या सत्तेच्या समीकरणाचे इंजिन आणि रिमोट कंट्रोल दोन्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून, सुनेत्रा पवार गुंगी गुडिया बनून राहतात की प्रभावीपणे काम करतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे, असेही सामनातून म्हटले आहे.
सध्या शिंदे गट आणि अजित पवार यांचा गट भाजपच्या मेहेरबानीवर टिकून आहे. मात्र २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शत प्रतिशत स्वबळावर लढणार आहे. त्याआधी शिंदे गट व अजित पवारांच्या पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील. त्या वेळीच सुनेत्रा पवार यांची खरी कसोटी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, असा दावा सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.