
आज सकाळपासूनच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाच्या पार्श्वभूमीवर, आज सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. थोड्याच वेळात भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. हे. या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्या तरी महत्वाच्या खात्यांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. याच दरम्यान, विभागांचे विभाजन, अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतही अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणतं खातं ?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं, मात्र आता सुनेत्रा पवार यांना कोणतं खातं मिळू शकेल याबद्दल अपडेट समोर येताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना क्रीडा विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. आधी अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खातं, हे मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील. याचा स्पष्ट अर्थ असा की पुढील काळात मांडलं जाणारं बजेट, हे देवेंद्र फडणवी हेच सादर करतील.
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील महिन्यात, 20 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील असा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या राजकीय गोंधळाच्या काळात, अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
विलीनीकरणावरून अजित पवार गटात नाराजी ?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अजित पवार गटातील काही आमदार, नेते आणि मंत्री हे मात्र विलीनीकरणाच्या बाजूने नाहीत, असं समोर येताना दिसत आहे. शरद पवारांच्या पक्षाशी वाटाघाटी सुरू होत्या, मात्र अजित दादांच्या जाण्यामुळे आता त्यात खंड पडल्याचे दिसत आहे. अजित पवार गटातील समर्थकांमध्ये आणि आमदारांमध्ये, विशेषतः सुप्रिया सुळेंबद्दल नाराजी असल्याचे वृत्त आहे. पक्षाकडून विलीनीकरणाच्या चर्चा थांबू शकण्याची शक्यता आहे.
राजभवनात होणार शपथविधी
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल आचार्य देवव्रत हे डेहराडून येथून दुपारी 4 वाजता मुंबईत पोहोचतील. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी संध्याकाळी 5 वाजता होईल. आजचा सोहळा फक्त 10 मिनिटे चालेल आणि सध्या फक्त एजन्सींनाच प्रवेश देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार या त्यांच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा देतील. हा राजीनामा राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला जाईल. राजीनाम्यानंतर, दुपारी त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड केली जाईल आणि संध्याकाळी शपथविधी पार पडेल.