सुप्रिया सुळे यांचा सुनेत्रा पवार यांना अचानक एका ओळीचा मेसेज; म्हणाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक सुनेत्रा पवार यांना मेसेज केला आहे. एका ओळीचा हा मेसेज आहे आणि त्याबद्दल खुद्द सुप्रिया सुळेंनीच माहिती दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे (बुधवार) सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजारी असल्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली. मंगळवारी मुंबईतील वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीलादेखील ते अनुपस्थित होते. कालची बैठकसुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या नेतृत्वात पार पडली. अजित पवारांच्या आजारपणासंदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना मेसेज केला आहे. खुद्द सुप्रिया सुळेंनीच याबद्दलची माहिती दिली. ‘गेट वेल सून’ असं लिहित त्यांनी अजित पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु सुनेत्रा पवारांचा मला अद्याप मेसेज आला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीमध्ये कोणीही कोणालाही भेटू शकतं. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात अद्याप प्रस्ताव आला नाही. आम्ही समविचारी पक्षांसोबत जाण्यास तयार आहोत,” असं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे महिला पोलीस अधिकारी दमदाटी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी सुळेंनी केली. महिला आयपीएससोबतच्या वादानंतर अजित पवार अडचणीत सापडले आहेत. कुर्डू गावातल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी यांच्यात फोनवरून संभाषण झालं होतं. याचवेळी अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकारीला कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.
“मेरिटवर पास झालेली मुलगी प्रामाणिकपणे काम करतेय. ती स्वतःच्या कर्तृत्वाच्या आधारे वर आली आहे. डिग्री दाखव म्हणजे तुम्ही यूपीएससीला थेट आव्हान करताय. तलाठी यांना मारहाण झाली अशी आधी तिथून बातमी झाली, नंतर पोलीस आले. जिल्हाधिकाऱ्यांनीही सांगितलंय की पोलिसांची कारवाई योग्य आहे. प्रामाणिकपणे लोकं काम करत असतील तर त्या इतर लोकांना पाठीशी घालू नये. जर असा त्रास अधिकाऱ्यांना झाला तर आम्ही रस्त्यावर येऊ. सुसंस्कृत महिला पोलिस अधिकारी यांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
