संजय राऊतांना विषप्रयोग झाल्याची शंका, शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. तुरुंगात असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शंका त्यांना आहे. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

जे लोक समाजासाठी लढतात, त्यांच्यावर तुरुंगामध्ये विषप्रयोग केला जाण्याची शक्यता असते. मीच नाही तर हे लोक अशा कोणत्याही व्यक्तीच्या जेवणामध्ये गडबड करू शकतात. मी जेव्हा तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा मला कॅन्सर झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. ते कोल्हापूर बोलत होते. दरम्यान तुमच्यावरही विषप्रयोग झाला का? असा सवालही यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना याबाबत राहुल गांधी यांनी शंका उपस्थित केली आहे, तसेच त्यांनी मला टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली आहे, मी टॉक्सिक टेस्ट करणार आहे, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
मला माहित नाही त्यांच्यावर कधी विषप्रयोग झाला, मात्र संजय राऊत बाहेर आल्यावर वेगवेगळे प्रयोग सांगत असतात. प्रयोग किती झाले हे मला तपासावं लागेल. असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गाधी यांनी मला टॅक्सिक टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर देखील यावेळी गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी कधी डॉक्टर झाले हे मला माहिती नाही. असा टोला यावर गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान अतंरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. यावर देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना सरकार सर्व द्यायला तयार आहे. एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी पहल केली आणि दहा टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे सरकार त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे.आपल्या मागण्या निश्चित पणाने मांडल्या पाहिजे. पण आगामी काळात गणपती तसेच सार्वजनिक उत्सव आहेत. त्यामुळे शांततेच्या मार्गाने त्या मागण्या मांडल्या पाहिजे, आणि ते मांडतील अशी अपेक्षा ठेवतो, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
