भर रस्त्यावरच खिळे टोचून टाकलं लिंबू, गावकरी घाबरले, तरूणाने त्याचंच केलं सरबत
सांगली जिल्ह्यातील टाकळी गावात रस्त्यावर खिळे टोचलेलं लिंबू आढळल्याने अंधश्रद्धेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, काही धाडसी ग्रामस्थांनी ते लिंबू कापून, त्याचे सरबत बनवून प्यायले. या कृतीमुळे अंधश्रद्धेला आव्हान देत, लोकांच्या मनातील भीती दूर करण्यात आली. अशा प्रकारांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

जग आता 21 व्या शतकात आहे, रोज नवनवे शोध लागतात, वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे तर जग कुठल्या कुठे पोहोचलं आहे. मात्र असं असलं तरीही काही भागांत अजूनही अंधश्रद्धेचं सावट कायम असून त्यामुळे लोकांच्या मनात भीती निपजते. असाच एक अंधश्रद्धेचा प्रकार सांगलीजवळ घडला आहे. तिथे टाकळीत भर रस्त्यावरच चक्क अंधश्रद्धा दिसून आली. एका रस्त्यावर खिळे टोचून लिंबू टाकलेलं होतं, त्यामुळे गावकरी दहशतीखाली होते, मात्र त्यांना धीर देण्यासाठी व असे काही प्रकार नसतात हे दाखवण्यासाठी गावातील एका ग्रामस्थाने आणि तरुणाने ते लिंबू कापून त्याचे सरबत करून प्यायले. आणि अंधश्रद्धेचा प्रकार मोडून काढला.
नेमकं प्रकरण काय ?
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी येथे गुरुवारी रस्त्यावरच चक्क अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आला. रस्त्यावर चांदणीच्या आकाराची आकृती काढून त्यात लिंबू व कुंकू टाकून, लिंबूत खिळे मारून उतारा टाकला होता. या प्रकाराने टाकली गावात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र एका ग्रामस्थाने आणि तरुणाने तो लिंबू कापून त्याचे सरबत करून प्यायल्याने आणि अंधश्रद्धेचा प्रकार मोडून काढला आहे.
ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच रस्त्यावर वर्तुळामध्ये चांदणीची आकृती रेखाटून त्यामध्ये लिंबू व कुंकू टाकण्यात आले होते. लिंबूत खिळेही घुसविण्यात आले होते. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी गावातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले. त्यांनी हा अंधश्रद्धेचा प्रकार मोडून काढला. येथे खिळे घुसवून व कुंकू लावून टाकण्यात आलेले लिंबू घेऊन ते स्वच्छ धुतले. ते लिंबू पाण्यामध्ये पिळून ते सरबत पिऊन टाकले. अशा प्रकाराने माणसाच्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. अशा गोष्टींना कोणीही घाबरू नये, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
