झेडपीच्या धुराळ्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादीत बरोबरीत, ठाकरे चौथ्या नंबरवर, वाचा सविस्तर
सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. (bjp number one party in maharashtra zilla parishad election)

ठाणे: सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फारशी चमक दाखविण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अपवादात्मक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती. मात्र, एकंदरीत सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपआपलं बळ दाखवलं होतं. जिल्हा परिषदेच्या 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवून आपणच राज्यात नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. तर काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17, शिवसेनेने 12 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविल आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 46, भाजपने 23 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविला आहे.

zp election
पालघरमध्ये राष्ट्रवादीला फटका, तर सेनेला फायदा
पालघरमध्ये 15 जागांपैकी शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीला चार आणि इतरांना एका जागेवर विजय मिळाला आहे. पालघरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. पालघरमध्ये शिवसेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. भाजपच्या एका जागेत वाढ झाली आहे. तर माकपने त्यांची एक जागा कायम राखली आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा पराभव झाल्याने ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली आहे. तर या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती झाली होती. मात्र, या युतीचा भाजपला काहीच फायदा झाला नाही. त्यामुळेही ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली.

zp election
नागपुरात काँग्रेसची सत्ता कायम
नागपूरच्या 16 जागांपैकी भाजपने 3, राष्ट्रवादीने 2, काँग्रेसने 9 आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला खातंही खोलता आलं नाही. नागपूर जिल्हाा परिषदेत काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर भाजलाही एक जागा गमवावी लागली आहे. शेकाप आि इतर पक्षांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम राहणार असून मंत्री सुनी केदार यांचं वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

zp election
वंचितला भाजपची साथ मिळणार?
अकोल्यात 14 जागांपैकी भाजप, काँग्रेस, शिवसेनेने प्रत्येकी एक, राष्ट्रवादीने दोन, वंचितने 6 आणि इतरांनी 3 जागा जिंकल्या आहेत. जिल्हा परिषदेत वंचित समर्थक दोन सदस्य होते. या निवडणुकीत भाजपच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीची एक जागा वाढली आहे. झेडपीत आता वंचित आणि महाविकास आघाडीतील पक्षांना समसमान 22 जागा मिळाल्या आहेत. अकोला झेडपीत सत्तेची चावी आता भाजप आणि अपक्षांच्या हाती असून वंचित कुणाची साथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

zp election
धुळे भाजपचेच
धुळ्यात 15 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 8, काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. सर्वाधिक जागा जिंकल्याने धुळे झेडपीत भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मात्र असं असलं तरी भाजपला या निवडणुकीत 3 जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांचा फायदा झाला आहे. याशिवाय काँग्रेस आणि शिवसेनेने आपापल्या जागा राखल्या आहेत. भाजप आमदार अमरीश पटेल यांचं शिरपूरमध्ये वर्चस्व कायम असून गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी झाल्या आहेत.

zp election
नंदूरबारमध्ये आघाडीची सत्ता?
नंदूरबारमध्ये 11 जागांपैकी भाजपने 4, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी 3 आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे. नंदूरबार झेडपीमध्ये भाजपने 3 जागा गमावल्या आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी नंदूरबार जिल्हा परिषदेत आघाडीचीच सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे नंदूरबारमध्ये आघाडी होते की भाजप सत्ता मिळवण्यात सरस ठरते याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आहे.

zp election
वाशिममध्ये राष्ट्रवादीचं चांगभलं
वाशिममध्ये 14 जागांपैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीला 5, इतरांना 4 आणि शिवसेनेला एका जागेवर विजय मिळविता आला आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात होते. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. यामध्ये काँग्रेसने 14 पैकी 9 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 11, आणि शिवसेनेने 12 आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. या पोटनिवडणुकीमध्ये वंचित आणि जनविकास आघाडीची युती झाली होती. वंचितने 12 तर जनविकास आघाडीने 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर भाजपाचे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

zp election
मनसेशी युती हवीच?
आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्रं राहिल्यास भाजपला कायमच सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याचं चित्रं आहे. त्यामुळे भाजपला सत्तेत जाण्यासाठी मनसेला सोबत घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय भाजपला बेरजेचं राजकारण करता येणार नाही. तसेच सत्तेचा सोपानही चढता येणार नाही. मनसेशी युती ही आता भाजपची मजबुरी झाली आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
जिल्हापरिषद एकूण 85 जागांचे निकाल
भाजप- 23 राष्ट्रवादी- 17 शिवसेना-12 काँग्रेस-17 इतर- 16
संबंधित बातम्या:
शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव
(bjp number one party in maharashtra zilla parishad election)
