उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ

उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीच्या दोन सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे (Clash between BJP and Omie Kalani team).

उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ
उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ


उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगर महापालिकेत आज प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. भाजपचे उमेदवार टोनी सिरवानी यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली. या निवडणुकीनंतर चार प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकांपूर्वी भाजप आणि टीम ओमी कलानीच्या दोन सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे (Clash between BJP and Omie Kalani team).

नेमकं काय घडलं?

टीम ओमी कलानीचे सर्व नगरसेवक हे मागील महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र आता टीम ओमी कलानीने महाविकास आघाडीला समर्थन दिलं आहे. त्यामुळे टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांना महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश होते. मात्र हे नगरसेवक महापालिकेत येताच भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी हे तर भाजपचे नगरसेवक असल्याचं सांगत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावरून टीम ओमी कलानीचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी त्यांना विरोध दर्शविला असता या दोघांमध्ये मोठी बाचाबाची झाली (Clash between BJP and Omie Kalani team).

‘…तर कलानी स्टाईल धडा शिकवू’

विशेष म्हणजे एकीकडे आमदार रवींद्र चव्हाण हे माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना बाजूलाच हा प्रकार घडला. तर त्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या आतही या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केलं. मात्र यानंतर पुन्हा जर असा प्रकार घडला, तर कलानी स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा कमलेश निकम यांनी थेट माध्यमांसमोरच दिला.

भाजपचे टोनी सिरवानी यांची बिनविरोध निवड

उल्हासनगर महापालिकेच्या बहुप्रतिक्षित अशा स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आज पार पडली. 16 सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे 8 आणि रिपाईचा 1 असे 9 सदस्य भाजपच्या बाजूने होते. तर शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी 1 सदस्य असे 7 सदस्य महाविकास आघाडीच्या बाजूने होते. त्यामुळे भाजपचाच उमेदवार जिंकणार, हे स्पष्ट असल्यानं शिवसेनेनं या निवडणुकीतून माघार घेतली, आणि भाजपचे टोनी सिरवानी हे स्थायी समितीचे सभापती म्हणून बिनविरोध निवडून आले.

चार प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव

यानंतर झालेल्या चार प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत मात्र भाजपचे साथीदार असलेले साई आणि टीम ओमी कलानी हे पक्ष महाविकास आघाडीत सामील झाले. त्यामुळे प्रभाग समिती क्रमांक 1, 2 आणि 3 वर महाविकास आघाडीचे अनुक्रमे हरेश जग्यासी, छाया चक्रवर्ती आणि दीप्ती दुधानी हे उमेदवार निवडून आले. भाजपच्या मीना कौर लबाना, महेश सुखरामानी आणि रवी जग्यासी या मातब्बरांचा पराभव झाला. तर प्रभाग समिती चारमधून राष्ट्रवादीच्या बंडखोर सुमन सचदेव यांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे विकास पाटील हे बिनविरोध निवडून आले.

संबंधित बातम्या :

उल्हासनगरात भाजपचा सिंह आला पण गड गेला, स्थायी समितीचं सभापतीपद जिंकलं, पण……….