ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेची संयुक्त रॅली, महाराष्ट्र बंदची हाक, दिग्गजांचा सहभाग

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे ठाणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेची संयुक्त रॅली, महाराष्ट्र बंदची हाक, दिग्गजांचा सहभाग
ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेची संयुक्त रॅली, महाराष्ट्र बंदची हाक, दिग्गजांचा सहभाग

ठाणे : लखीमपूर खिरी येथील शेतकर्‍यांच्या नृशंस हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला ठाणे शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे ठाणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सबंध शहरभर संयुक्त रॅली काढली. या रॅलीमध्ये महापौर नरेश म्हस्के हे देखील सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खिरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

रॅली संपूर्ण शहरात फिरली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयापासून सकाळी 9 वाजता रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व आनंद परांजपे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष कैलास हावळे, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, लीगल सेलचे अध्यक्ष विनोद उत्तेकर, असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष राजू चापले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली जांभळी नाका येथे आली असता महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश वैती यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक रॅलीमध्ये सहभागी झाले. ही रॅली सबंध शहरभर फिरविण्यात आली.

आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, यावेळी आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. “लखीमपूर खिरी येथे झालेल्या शेतकर्‍यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बंदचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने ठाण्यात शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बंद पुकारण्यात आला होता”, असं आनंद परांजपे म्हणाले.

‘केंद्रातील सरकारला चले जावचा इशारा द्यायला हवा’

“हा बंद राजकीय नसून बळीराजाच्या समर्थनार्थ आहे. ठाणेकरांनी या बंदला समर्थन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. आज या बंदमध्ये व्यापार्‍यांनीही आपला सहभाग नोंदविला आहे. मात्र, ज्यांना हे नुकसान वाटत असेल त्यांनी ध्यानात ठेवावे की जगलो तर व्यापार करु, आज शेतकर्‍यांना चिरडले आहे. उद्या व्यापार्‍यांना चिरडण्यात येईल. म्हणून आता त्यांनीही केंद्रातील सरकारला चले जावचा इशारा द्यायला हवा”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

हा तर ‘शासकीय इतमामातील’ बंद; आशिष शेलारांची खवचट टीका

एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?; देशमुखांच्या घरावरील धाडसत्रावरून जयंत पाटलांचा सवाल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI