ज्वेलर्सच्या बाजूला भाजीचं दुकान उघडलं, दोन महिने मुक्काम, संधी मिळताच भगदाड पाडून दरोडा

दरोड्यात ज्वेलर्समधील अडीच किलो सोने आणि 30 किलो चांदी चोरीला गेले (Robbery of jeweler shop in Thane).

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 21:01 PM, 17 Jan 2021
ज्वेलर्सच्या बाजूला भाजीचं दुकान उघडलं, दोन महिने मुक्काम, संधी मिळताच भगदाड पाडून दरोडा

ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर येथील शिवाईनगर परिसरात असलेल्या वारीमाता ज्वेलर्सवर रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दरोडा पडला. फळ दुकानातून भगदाड पाडून या ज्वेलर्सवर दरोडा पडला. दरोड्यात दुकानातील अडीच किलो सोने आणि 30 किलो चांदी चोरीला गेले आहे. या दरोड्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत (Robbery of jeweler shop in Thane).

शिवाईनगरमध्ये वारीमाता गोल्ड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या गाळ्यात फळविक्रीचे दुकान होते. हे दुकान गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरु झाले. परराज्यातील एका इसमाने फळविक्रीच्या नावाने संबंधित गाळा 28 हजार रुपये भाड्याने घेतला होता. अधिक भाडे मिळत असल्याच्या लालचेने दुकान मालिक पाटील यांनी कुठलीही चौकशी न करता दुकान भाड्याने दिलं (Robbery of jeweler shop in Thane).

संबंधित इसमाने दुकान भाड्याने घेतल्यानंतर या दुकानात दोन महिने फळ विक्रीचा व्यवसाय केवळ नावापुरता सुरु केला. त्याने संधी मिळताच रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास फळाचे दुकान आणि ज्वेलर्सच्या दुकानात असलेली सामाईक भिंत फोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश केलेल्या आरोपीने दुकानातील तिजोरी गॅसकटरने कापली आणि तिजोरीतील अडीच किलो सोने आणि 30 किलो चांदी घेऊन तो पोबारा झाला.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

वारीमाता गोल्ड ज्वेलर्सचा दरोडा हा पूर्वनियोजित दरोडा होता, हे स्पष्ट होत आहे. घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांनी पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे घेतले आहेत. वर्तकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून मिळालेल्या सीसीटीव्हीच्या मार्फत आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्वेलर्स मालकाने केली आहे.

हेही वाचा : मराठमोळ्या उद्योजकावर दक्षिण आफ्रिकेत प्राणघातक हल्ला, जळगावचे तरुण उद्योजक मणियार यांचं निधन