संजय राऊत यांचे व्याही कोरोना पॉझिटिव्ह, ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर होम क्वारंटाईन

कोरोनावर मात करुन लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वास व्यक्त करतानाच गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचं आवाहन राजेश नार्वेकर यांनी केलं

संजय राऊत यांचे व्याही कोरोना पॉझिटिव्ह, ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर होम क्वारंटाईन
संजय राऊत, राजेश नार्वेकर

ठाणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे व्याही, पूर्वशी राऊत यांच्या सासऱ्यांना कोव्हिडची लागण झाली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांची कोरोना चाचणी काल पॉझिटिव्ह आली. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या गृह विलगीकरणात आहेत.

काय म्हणाले राजेश नार्वेकर?

कोरोनावर मात करुन लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वास व्यक्त करतानाच गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचं आवाहन राजेश नार्वेकर यांनी केलं. कोरोनासंबंधी लक्षणं दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असंही राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.

कोण आहेत राजेश नार्वेकर?

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा विवाह डिसेंबर महिन्यात संजय राऊत यांची कन्या पूर्वशीसोबत झाला. संजय राऊत यांचे व्याही- ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी आहेत, तसे त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काम केले आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. तसेच त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालखंडात रायगड जिल्हा हगणदारीमुक्त झाला. त्यानंतर त्यांनी 2018मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची बदली ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी झाली.

कोरोना काळात उत्तम कामगिरी

राजेश नार्वेकर यांनी कोरोना काळात ठाण्यात अत्यंत चांगलं काम केलं. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी कठोर उपाययोजना अवलंबल्या होत्या. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन व्हावं म्हणून त्यांनी यंत्रणा कामाला लावली होती. तसेच लॉकडाऊन काटेकोर पाळला जावा म्हणून जमावबंदी सारखे आदेशही त्यांनी काढले होते. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवरही त्यांनी जरब बसवली होती. त्याशिवाय आरोग्य यंत्रणाही त्यांनी सुसज्ज ठेवल्या होत्या. रोज बैठका घेणं, अधिकाऱ्यांशी संवाद साधणा, रुग्णालयांना भेटी देणं आदी गोष्टींवर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या कामांची अनेकांनी स्तुतीही केली होती.

संबंधित बातम्या :

Corona : आरोग्य कर्मचारीचं कोरोनाच्या विळख्यात, उल्हासनगर अंबरनाथमधील फ्रंटलाईन वर्कर्सना कोविड

Uddhav Thackeray | ‘रोजीरोटी बंद करायची नाही! पण…’ वाढत्या रुग्णसंख्येवर मुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

Published On - 8:33 am, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI