कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क अभिनेत्रीचं लसीकरण, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीचं लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Actress Meera Chopra get vaccinated on fake identity card)

कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क अभिनेत्रीचं लसीकरण, ठाण्यातील धक्कादायक प्रकार
कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क अभिनेत्रीचं लसीकरण


ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीचं लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित महिलेकडे फ्रंटलाईन वर्करचं ओळखपत्र होतं. एकीककडे लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक भागात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे, जेणेकरुन 45 वर्षांवरील नागरिकांना लस देता येईल. पण कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका अभिनेत्रीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे (Actress Meera Chopra get vaccinated on fake identity card).

सखोल चौकशी करा, भाजपची मागणी

संबंधित महिलेला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे देखील तपासावे लागणार आहे. त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्थादेखील अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. तर याबाबत पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे तोंडी सांगितले आहे.

अभिनेत्रीचं नाव काय?

संबंधित अभिनेत्रीचं नाव मीरा चोप्रा असं आहे. या अभिनेत्रीने लस घेतल्यानंतर स्वतःच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर लस घेतल्याची पोस्ट टाकली होती. या प्रकरणावरुन सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर मीरा चोप्रा हिने आपले फोटो काढल्याचेही दिसून आले आहे (Actress Meera Chopra get vaccinated on fake identity card).

भाजपकडून कारवाईची मागणी

“राज्य शासनाकडून 18 ते 44 वयोगटातील तरुणांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. तसेच ठाण्यातील सर्वसामान्यांना देखील लस घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु असे असतांना सेलेब्रिटींना पार्किंग प्लाझा येथे लस कशी मिळवली. ते वयात बसतात का? त्यांच्यासाठी लस कशी उपलब्ध करुन दिली जाते, या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, असे ठाणे महानगर पालिका भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले आहे.

महापालिका उपायुक्तांची प्रतिक्रिया

“या प्रकरणाचा तपास करुन कुणी अशा प्रकारे लस दिली, संबंधित सेलेब्रिटीचे वय कीती आहे, तसेच संबधित संस्थेकडून तिला ओळखपत्र कसे देण्यात आले, याची माहिती घेतली जाईल. तसेच योग्य ती चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल”, असे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी तोंडी सांगितले आहे.

खासगी कंपनीकडून ओळखपत्र

ओम साई आरोग्य केयर सेंटर या खाजगी कंपनीने मीरा चोप्रा हिला सुपरवायझर भासवून लस देण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनी आणि इतर जणांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीदेखील टीका केली आहे.

निरंजन डावखरे नेमकं काय म्हणाले?

“ठाण्यातील पार्किंग प्लाझा या ठिकाणी असणाऱ्या ओम साई आरोग्य केयर सेंटर या खाजगी कंपनीने एका सेलिब्रेटीला सुपरवायझर म्हणून नेमले आहे का? ती खरोखर सुपरवायझर आहे का? की फक्त लस घेण्यासाठी तिला सुपरवायझर नेमले आहे? असा घोळ समोर आल्याने अनेक प्रकरण समोर येतील. याआधी देखील याच एजन्सीच्या मार्फत वेंटीलेटरचा घोळ समोर आल्याने अनेकांना अटक झाली होती. त्यामुळे पालिका आयुक्तांनी याबाबत चौकशी करून सर्व प्रकार समोर आणावा”, अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

हेही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, जबरदस्ती गर्भपात करायला भाग पाडलं, प्रसिद्ध अभिनेत्रीचा माजी मंत्र्यांवर गंभीर आरोप