वसंत पंचमीला विठ्ठल-रुख्मिणी मातेचा शाही विवाह पार पडणार, 36 प्रकारच्या 5 टन फुलांची सजावट

शाही विवाह सोहळ्यासाठी मंदिर परिसरात 36 प्रकारच्या 5 टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केलीय.

वसंत पंचमीला विठ्ठल-रुख्मिणी मातेचा शाही विवाह पार पडणार, 36 प्रकारच्या 5 टन फुलांची सजावट
विठ्ठल रुख्मिणी शाही विवाह सोहळा फाईल फोटो

पंढरपूर : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सर्वांचा लाडका देव असलेला विठ्ठल आणि रुख्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पार पडतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी मंदिर परिसरात 36 प्रकारच्या 5 टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केलीय. या विवाह सोहळ्याला स्वर्गातील देव उपस्थित राहणार असल्याचा आकर्षक देखावाही साकार करण्यात आला आहे.(The royal wedding ceremony of Vitthal-Rukmini)

शाही विवाह सोहळ्याची आख्यायिका

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुख्मिणी मातेचा विवाह झाला होता, असा उल्लेख संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुख्मिणी स्वयंवरात केला आहे. हा विवाह सोहळा या आधी उत्पात समाज करत होता. त्यानंतर आता मंदिर समिती विठ्ठल मंदिर तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रमात हा सोहळा साजरा करुन परंपरा जपतात. हा सोहळा दिमाखदार करण्यासाठी संपूर्ण मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवलं जातं. सकाळी विठ्ठल आणि रुख्मिणीला शुभ्र वस्त्रांनी, तर रुख्मिणी मादेला मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकारांनी सजवलं जातं.

विठ्ठल रुख्मिणी शाही विवाह सोहळा फाईल फोटो

साधारण सकाळी 11 वाजता रुख्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला जातो. तिथे गुलालाची उधळण केली जाते. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुख्मिणी मातेकडे घेऊन जातात आणि तिथेही गुलालाची उधळण केली जाते. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुख्मिणीची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणली जाते. दोन्ही मूर्तींना मुंडावल्या बांधल्या जातात. त्यानंतर अंतरपाठ धरला जातो. विवाह सोहळ्याला उपस्थित लोकांना फुलं आणि अक्षतांचं वाटप होतं. त्यानंतर मंगलाष्टका होतात. मंगलाष्टका संपल्यावर उपस्थितांच्या टाळ्या आणि टाळ-मृदुंगाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून जातो. अशा प्रकारे श्री विठ्ठल आणि रुख्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडला जातो.

विठ्ठल रुख्मिणी शाही विवाह सोहळा फाईल फोटो

विठ्ठलाची रंगपंचमी सुरु

वसंत पंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला पांढरा शुभ्र वेश परिधान केला जातो. या काळात रोज विठ्ठलाच्या अंगावर गुलालाची उधळण होते. वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरु राहते. विठ्ठलाच्या या रंगपंचमी उत्सवाची सुरुवात वसंत पंचमीपासूनच होते.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन नोंदणीशिवाय भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय

Ashadhi Ekadashi | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा

The royal wedding ceremony of Vitthal-Rukmini