Tukaram Mundhe FDA : दिवाळीत फक्त ‘या’प्रकारची मिठाई खरेदी करा, तुकाराम मुंढेंचा नागरिकांना मोलाचा सल्ला
Tukaram Mundhe Video : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांसाठी विशेष व्हिडिओ जारी केला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना योग्य मिठाई खरेदीचे आवाहन केले तर उत्पादकांना थेट इशाराही दिला.

दिवाळीच्या सणाला दणक्यात सुरुवात झालेली आहे. आता उद्या म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन आहे. त्यामुळे असे असताना घराघरांमध्ये फराळ आणि मिठाई खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र, सणाच्या आनंदात गोड गोड खाताना आरोग्याशी खेळ खेळला जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आक्रमक अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कंबर कसली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नागरिकांसाठी एक विशेष व्हिडिओ जारी करत त्यांनी मिठाई खरेदी करताना अत्यंत सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत. “सुरक्षित अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, तो कोणतीही सणापुरती भेटवस्तू नाही,” असे म्हणत त्यांनी सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला आहे.
नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
मिठाई खरेदी करताना नागरिकांनी पॅकेटवरील मॅन्युफॅक्चरिंग डेट (उत्पादनाची तारीख), एक्सपायरी डेट आणि ‘बेस्ट बिफोर’ तारीख आवर्जून तपासावी. ज्या दुकानाकडून मिठाई घेत आहात, त्यांचेकडे FDA चा परवाना असल्याची खात्री करून बिलावर FSSAI परवाना क्रमांक छापील असल्याची तपासणी करावी. गरजेपुरतीच मिठाई खरेदी करून ती २ ते ३ दिवसांत संपवावी, कारण मिठाई फ्रीजमध्ये ठेवली तरी तिचा दर्जा कायम राहीलच असे नाही. तसेच, उत्पादकांनी अन्नात नैसर्गिक रंगांचाच वापर करावा. गिफ्ट पॅकमध्ये असलेल्या इतर वस्तूंचा दर्जाही योग्य असणे आवश्यक असून निकृष्ट वस्तू आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. आजकाल ऑनलाइन मिठाई मागवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पार्सल मिळाल्यावर त्याची एक्सपायरी डेट, पॅकेटची स्थिती आणि योग्य ब्रँडची खात्री केल्याशिवाय ते स्वीकारू नये.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जर कोणत्याही नागरिकाला भेसळयुक्त, निकृष्ट किंवा खराब दर्जाची मिठाई आढळल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक Complaints.mahafda.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. तक्रार प्राप्त होताच संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल. मिठाई उत्पादक आणि दुकानदारांनी नियमांचे पालन करून ग्राहकांचा विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
