
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. मोर्चा रद्द झाल्यानंतर 5 जुलै रोजी विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोघं बंधू एकत्र येणार आहेत. दादरच्या शिवाजी पार्क इथं हा मेळावा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर तालुक्यातील सराटी इथल्या मुक्कामानंतर आज सोलापुरात प्रवेश करणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील महत्वाचा भाग असलेला शाही निरा स्नान सोहळा आज संपन्न होणार आहे. नीरा नदीवर स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
क्वाड बैठकीपूर्वी परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी मुक्तपणे फिरतात. भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आम्ही आमचे अधिकार वापरू. पीडित आणि गुन्हेगार समान असू शकत नाहीत.
एलोन मस्क यांना हद्दपार करण्याच्या प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, मस्क यांना यापेक्षाही जास्त नुकसान होऊ शकते. मी मस्क यांना हद्दपार करण्याचा विचार करेन. ईव्ही मँडेट गमावल्याबद्दल एलोन मस्क खूप नाराज आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, या हल्ल्याचा उद्देश काश्मीरमधील पर्यटन नष्ट करणे होता. या हल्ल्याचा उद्देश धार्मिक हिंसाचार भडकवणे देखील होता. भारताने स्पष्ट केले की ते अणु ब्लॅकमेल सहन करणार नाही. पहलगाम हल्ल्यानंतर देशात अशी भावना निर्माण झाली की आता पुरे झाले. गेल्या काही वर्षांत भारतात अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत.
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. येत्या 6-7 दिवसांत संपूर्ण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच्या पक्षात लोकशाहीचा गळा दाबला आहे, या राजद नेते तेजस्वी यादव यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, लालू यादव यांनी घराणेशाहीला प्रोत्साहन दिले, त्यांनी कधीही लोकशाही स्वीकारली नाही.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची अवस्था गंभीर झाली आहे. चार वर्गांसाठी फक्त एकच शिक्षक असल्याचे समोर आले आहे. त्यामळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच प्रचंड नुकसान होत आहे. सिरोंचा तालुक्यात 122 शाळांमध्ये फक्त 135 शिक्षक कार्यरत आहे. वर्ग एक ते चार मध्ये एक शिक्षक आणि वर्ग एक ते सात मध्ये दोन शिक्षक अशी गंभीर परिस्थिती आहे
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एका तरूणाचा क्षुल्लक करणावरून खून केल्याची घटना घडली आहे. स्वप्निल गोसावी असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भूपेश वंजारी आणि रवी बॅनर्जी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विदर्भात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही, मात्र जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी व्यक्त केला आहे. विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे, मात्र 6 जुलै नंतर पावसाचा जोर वाढणार असं कुमार यांनी म्हटलं आहे.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि बोलेरो जीपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरो जीपचा चालक ठार झाला तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना किनवट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पुण्याच्या खेड आळंदी मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला असून खेड तालुक्यातील अनेक सरपंच आणि उपसरपंच सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ..
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आज एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांची भेट घेतली. यावेळी इम्तियाज जलील यांनी रमाई घरकुल योजनेत 100 कोटी रुपया पेक्षा जास्त भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
वारीदरम्यान काही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार लाखाची मदत मिळणार आहे. वारकऱ्यासंदर्भात सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर झाले आहे. जर वारीदरम्यान कुठलाही अपघात झाला आणि 60 टक्के होऊन अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखाची मदत सरकार देणार आहे. 60% पेक्षा कमी अपंगत्व आल्यास सरकार 74 हजाराची मदत करणार आहे.
चारधाम येथे गेलेले महाराष्ट्राचे पर्यटक अडकले आहेत. तेथील पर्यटनमंत्र्यांच्या आम्ही संपर्कात आहेत, आमची टीम तेथे रवाना झालेली आहे.आज संध्याकाळपर्यंत रस्ता खचला तेथून पर्यटकांना बाहेर काढलं जाईल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. भुममध्ये शिवाजी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सपशेल माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांचे 15 संचालक खरेदी-विक्री संघावर बिनविरोध आले निवडून आले आहेत. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. त्यामुळे सावंतांच्या सर्वच संचालकांनी अर्ज माघारी घेतले. भूम येथील शिवाजी खरेदी-विक्री संघाची चार ते पाच कोटी वार्षिक उलाढाल आहे.
राज्य सरकारने हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द केल्यानंतर आता वरळीत 5 जुलै रोजी विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यानिमित्ताने ठाकरे बंधु एकत्र येणार आहेत. तसेच मराठी जनतेला ठाकरे बंधुंनी वाजत गाजत येण्याचं आवाहन केलं आहे. उपमुख्यमंत्री यांनी ठाकरे बंधुंच्या या विजयी मेळाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडाच्या दुर्गम भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सातपुडा आणि आसपासचा परिसर हिरवागार झाला आहे. सातपुडा धुक्याची चादर पसरली आहे. सातपुडा होत असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले प्रवाहित झाले आहेत. तसेच पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न देखील सुटणार आहेत. त्यासोबतच शेती पिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.
मीरा भाईंदरमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला मारहाण करणाऱ्या मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिमिरा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 7 मनसैनिका विरोधात शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली गेली आहे.
आय. टी . चे वॉटर पार्क करणाऱ्या बड्या बिल्डरांच्या अनधिकृत कृत्याचा पर्दाफाश करत पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी हिंजवडीतील नैसर्गिक नाले बुजवून व वळवून त्यावर टोलेजंग इमारत उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. म्हसे यांनी आज हिंजवडीतील ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले बुजविल्या आणि वळवील्या गेले अशा 16 ठिकाणची पाहणी केली. टोलेजंग इमारती उभारण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलला गेल्याने आत्तापासूनच इमारतीच्या पायाखाली पाणी साचत असल्याने भविष्यात मोठी आपत्ती ओढवू शकते ही शक्यता लक्षात घेऊन नाल्यांवर बांधकाम उभारणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिका विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं म्हसे यांनी म्हटलं.
बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांची आज पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात येत आहे. यासाठी आरोपींना घेऊन पोलीस न्यायालयात दाखल झाले असून आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते की त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
108 रुग्ण वाहिका चालक युनियन महा राज्य बेमुदत धरणे आंदोलन करत लवकरच संपावर जाणार आहेत. समान काम समान वेतनासाठी रुग्ण वाहिका चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 5 जुलैला बेमुदत संपावर जाणार असेही म्हटले आहे
वडगाव बुद्रुक परिसरातील गजानन ज्वेलर्स नावाच्या दुकानदारावर कोयत्याने वार करत दरोडा. दिवसाढवळ्या कोयत्याने वार करत दरोडा पडल्याने पुण्यात खळखळ. दुकानाच्या मालकासह एकजण गंभीर जखमी. चार दरोडेखोरांनी कोयत्याने वार करत टाकला दरोडा.
शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध. शक्ती पीठ महामार्गाला विरोध दर्शवत परभणी /नांदेड महामार्गवर वसमत शहरा जवळ रास्ता रोको. रास्ता रोको मुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजुनी वाहनांच्या रांगा.
जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात पावसाने घेतली उघडीप. पावसाने उघडीप घेतल्यामुळे पेरणीची कामे रखडली आहेत. आज दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत असल्याने पेरणीला आता वेग येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली होती, त्यांना हा पाऊस दिलासा देणारा ठरणार.
उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली काँग्रेस नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी करण्यात आली जय्यत तयारी. प्रदेश कार्यालयाबाहेर स्टेज टाकत मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था करत ढोल ताशासह भाजपचे झेंडे लावत करण्यात आली जय्यत तयारी. 75 वर्ष काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिल्यानंतर कुणाल पाटील धुळ्यातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांना घेऊन भाजपमध्ये थोड्यावेळात प्रवेश करणार आहेत.
जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल त्याला सभागृहातून निलंबित करायचं आणि जो शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतील, त्यांची चेष्टा करतात, त्यांना हे सरकार सन्मानाने वागवतं असं हे सरकार आहे – नाना पटोले
भाजप-महायुतीच्या सरकारला माज आला आहे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला माज आलेला आहे. या सरकारची वास्तविकता आपल्यासमोर आलेली आहे, यांचे आमदार, कृषीमंत्री हे शेतकऱ्यांना भिकारी समजतात – निलंबनाच्या कारवाईनंतर नाना पटोलेंनी घणाघाती टीका केली
नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोणीकरांनी शेतकऱ्यांसदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोले हे सभागृहात आक्रमक झाले होते, त्यांनी थेट सभापतींचं आसन गाठल्याने सभागृहात गदारोळ झाला.
नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यामुळे विधानसभेत गोंधळ माजला असून काँग्रेस नेते नाना पटोले अतिशय आक्रमक भूमिकेत आहेत. जोरदार गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं.
देवेंद्र फडणवीसांनी कायम माझ्यावर लक्ष ठेवावं – भास्कर जाधवांचं खोचक उत्तर. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत बास्कर जाधव दिसले नव्हते. भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाचा फडणवीसांनी ह विधान केलं. आता त्यावर जाधव यांनी हे प्रत्युत्तर दिलंय.
डहाणू-जव्हार रोडवर ST महामंडळाच्या बसचा अपघात झाला. विक्रमगडमधील तलवाडा येथे एसटी एका बाजूला पूर्णपणे कलंडली असून तेथे हा भीषण अपघात झाला आहे, मात्र सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गोंदिया जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले भरले आहेत. वैनगंगा नदीवरील धापेवाढा बॅरेजचे देखील तीन दरवाजे सुरू करण्यात आले आहेत. सध्या 14000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी किसान सभा आणि शेतकरी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या एक तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे अंबाजोगाई-परळी आणि अंबाजोगाई-अहमदपूर-धायगुडा पिंपळा या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकरी महिलाही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या महामार्गाला विरोध करत होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. मोहोळ ते पंढरपूरकडे जाणारा महत्त्वाचा पालखी मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. मोहोळ तालुक्यातील सात ते आठ गावांमधून प्रस्तावित असलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी तीव्र विरोध दर्शवत हे आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयोगातील रिक्त असलेली तीन सदस्य पदे आता भरण्यात आली आहेत. राजीव निवतकर, डॉ. दिलीप भुजबळ पाटील आणि महेंद्र वारभुवन या तीन सदस्यांची राज्यपाल महोदयांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे एमपीएससी आयोगातील कामकाजाला गती मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. आयोगात तीन पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता, मात्र आता ही पदे भरल्याने प्रशासकीय पातळीवर सुसूत्रता येईल.
माणगाव तालुक्यात असणाऱ्या कुंभे परिसरातील चणाट धबधब्यावर एक व्यक्ती बुडाल्याची दुर्घटना… यंदाच्या पावसाळी पर्यटनाची पाचवी दुर्घटना… जिल्ह्यातील बचाव पथकाकडून बुडालेल्या तरुणाचा शोध कार्य सुरू… काल संध्याकाळी उशिरा पोहण्यासाठी कुभे परिसरातील चणाट धबधब्यावर गेले असता घडली घटना… घटनास्थळी पोलिस देखील दाखल
नाशिकच्या रामवाडी परिसरातील पुलालगत असलेल्या बेंडकुळे मळ्या जवळ आढळून आला बिबट्या… बिबट्याचा मुक्त संचाराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद… नागरी वस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नगर परिषदेकडून आठ वर्षे थकलेल्या भाडे थकबाकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, तब्बल ५० लाख रुपयांच्या थकबाकीच्या अनुषंगाने नगर परिषदेमधील साहित्य कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या कारवाईत मुख्याधिकारी यांच्या केबिनमधील सर्व साहित्य, खुर्च्या, संगणक तसेच नगर परिषदेकडे असलेले एक बुलेरो वाहन देखील जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे नगर परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
वाघ अजून जिवंत आहेत, हे त्यांना सांगण्यासाठी गुड मॉर्निंग केलं… 5 जुलैला विजयी दिवस, याचं निमंत्रण मोदी, शाहांना देणार… आम्ही लढणारे लोक आम्ही उभे राहणार लढणार… विजयी दिवसाचा सोहळा शिवतिर्थावर व्हावा… अशी आमची इच्छा… मोदी, शाह, फडणवीसांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
जालना जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालनात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून सात जुलैपर्यंत हा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरीत रात्रीपासून पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 33 मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली आहे.
धाराशिवच्या वाशीमध्ये पवनचक्कीच्या विरोधात गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. उपोषणकर्त्या सात शेतकऱ्याची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली काँग्रेस नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या आज होणार भाजप पक्षात पक्ष प्रवेश करत आहे. अनेक वर्ष काँग्रेस सोबत राहिल्यानंतर कुणाल पाटील धुळ्यातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी घेऊन भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहे.
जुलैमध्येही देशभरात 106 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायमच राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात 106% पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस शक्यता आहे.
काल रात्री मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली. सांताक्रुजच्या ग्रँड हयातमध्ये तिन्ही नेत्यांची भेट झाली. विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
पुणे पोलिसांकडून 140 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत. शहरात गुन्हेगारी वाढल्यामुळे अनेकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी तर काहींनी स्टेटस सिम्बॉलसाठी पिस्तूल परवाना मिळवण्याचा आग्रह धरला आहे. मात्र पोलीस आयुक्त आम्ही देश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील साधारण दीड वर्षाच्या अर्जांवर फेरविचार करत कठोर धोरणे अवलंबली आहेत. परिणामी 140 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले असून 400 हून अधिक अर्ज पोलिसांनी नाकारले आहेत.
शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप मधून शरद पवार गटात येऊन गणेश गीते यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गणेश गीतेसोबत काही माजी नगरसेवकसुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत.
गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात गणेश गीते यांनी निवडणूक लढवली होती. येत्या दोन दिवसात गणेश गीते आणि समर्थकांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोअर भागातील सफारी पर्यटन आजपासून बंद असेल. 1 जुलैपासून तीन महिने पावसाळ्याच्या काळात कोअर भागातील पर्यटनावर बंदी असते. गेल्या वर्षभरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकूण 4 लाख 6 हजार पर्यटकांनी भेट दिली. आता 1 ऑक्टोबर 2025 रोजी कोअर भागातील पर्यटन पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
पावसाळ्याच्या काळात अरुंद , निसरडे कच्चे रस्ते असलेल्या कोअर भागात अपघातांची शक्यता वाढते. याशिवाय ताडोबातील वन्यजीवांचा हा प्रजननाचा काळ मानला जातो आणि त्यामुळेच या भागातील पर्यटन बंद असते. असं असलं तरी बफर क्षेत्रामधील पर्यटन मात्र सुरू राहणार आहे. आगरझरी, देवाडा ,जुनोना , कोलारा, बेलारा आणि अलिझंजा यासह नवेगाव या बफर क्षेत्रातील गेटवर वन्यजीव प्रेमींना सफारीचा आनंद घेता येणार आहे.
अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विमानातील संगणकीय बिघाड अपघाताला कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतील विमानतज्ज्ञ मेरी स्किआव्हो यांनी हा दावा केला आहे. विमान हवेत असताना संगणकाने जमिनीवर असल्याचं सांगितल्याने अपघात झाल्याचं म्हटलं गेलंय.