चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, कार आणि ऑटोच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 15 जखमी
चद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत.

चंद्रपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, कार आणि ऑटो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातल्या येन्सा येथे ही घटना घडली आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातील येन्सा परिसरामध्ये घडला आहे. रामपूर येथील काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोऱ्याला जात असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलांची नावं आहेत.
या अपघातातील जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त सर्व मजूर हे वरोरा येथील रहिवासी असून ते मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते. काम संपवून परतत असताना त्यांच्या रिक्षाला कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमवाला लागला तर पंधरा जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये रिक्षाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान असाच एक भीषण अपघात आज तेलंगणाध्ये देखील घडला आहे. रेल्वे रुळासाठी लागणारे लोखंडी रॉड वाहून नेणाऱ्या एका ट्रकनं ऑटो रिक्षाला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे लोखंडी रॉड दोन ऑटो रिक्षांवर आदळले. या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी आहेत. हा अपघात झाला तेव्हा या ट्रकचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत सात जणांना आपला जीव गमवावा लागला.
