उद्धवजी आता तुम्ही महाराष्ट्र पाहा, आदित्यवर मुंबई सोपवा… जयंत पाटील यांच्याकडून आदित्य ठाकरेंच्या भाषणाचं तोंडभरून कौतुक
मुंबई महानगर पालिका निवडणूकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले असताना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीची आज मुंबईतील पहिली जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी छोटेखाणी भाषण केले.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र आल्यानंतर शिवतीर्थवर पहिली जाहीर सभा झाली. यासभेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण केले. या भाषणाचे कौतूक राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तोंडभरुन कौतुक केले. ते यावेळी म्हणाले की आजपर्यंत मी उत्तम भाषण कधी ऐकलं नव्हतं एवढं सुंदर भाषण आदित्य ठाकरे यांचं ऐकलं. उद्धवजी तुम्ही थोडे लेट आलात. मुंबई काय आहे, मुंबईची नस काय आहे. काय करायचं आहे याची ज्याला जाण आहे असे आदित्य ठाकरे मी पाहिले. उद्धवजी तुम्ही आता महाराष्ट्र पाहा, मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवून द्या. एवढे ते तयार झाले आहेत असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
जयंत पाटील यावेळी म्हणाले की मागचं पोस्टर पाहिलं तर दिसतं भावकी एक आहे. मुंबईत फिरलो. तेव्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा मुंबईकरांना आनंद झालेला पाहिलं. राज्यातील कानाकोपऱ्यातील लोकही पाहत आहेत. तुम्ही दोघं आलात. एकत्रित आलात, त्याबद्दल शरद पवार यांच्यावतीने मी तुमचं दोघांचं अभिनंदन करतो. पवार साहेब येणार होते. त्यांना जमलं नाही. त्यांनी मला यायला सांगितले असेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेना महत्त्वाची आहे, हे पवारांना वाटायचं…
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, येथून आम्ही नेहमी बाळासाहेबांचं भाषण टेलिव्हिजनवर पाहायचो. तेच मैदान आहे, तिच शिवसेना आहे. पण शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत. काही दिल्लीचे गुलाम आहेत. या सर्वांना मुंबईकर खड्यासारखं बाहेर केल्याशिवाय राहणार नाही. याच शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेची पहिली सभा झाली. शरद पवार यांनी इथल्या कट्ट्यावर बसून त्यांचं भाषण ऐकलं. दोघांचे पक्ष वेगळे होते. पण बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्यांची शिवसेना महत्त्वाची आहे, हे पवारांना वाटायचं. शरद पवार यांनीही याच मैदानावरून पक्षाची स्थापन केल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
…त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे
साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे. कालपरवा अण्णामलाई आले. मुंबई महाराष्ट्राची नाही ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुंबईला तोडण्याचा उद्योग सुरू झाला आहे. वेगवेगळ्या राज्यातील लोकं मुंबईत येत आहे. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री आला असेल. सर्वांना बोलावण्याचं काम सुरू आहे. पण राज आणि उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहात. तुम्हाला आमची साथ आहे. तुम्हाला मराठी माणूस यश देईल, मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील हा विश्वास व्यक्त करतो असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
