उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर, त्यांनी स्वत:च्या पक्षाला…; भाजपने डिवचलं
वरळी डोममधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना 'ॲनाकोंडा' संबोधत टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना 'घरात बसलेले अजगर' म्हटले. या शाब्दिक युद्धामुळे महाराष्ट्र राजकारणात ठाकरे गट आणि भाजपमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे.

मुंबईतील वरळी डोममध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा अप्रत्यक्ष अॅनाकोंडा असा उल्लेख केला. यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अजगर असा केला. त्यामुळे आता भाजपा आणि ठाकरे गटात खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं,वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं, अशा शब्दात टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली. इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात.
आदरणीय अमितभाई शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात, ३७० कलम रद्द करून इतिहास रचतात. आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदी जी आणि अमित भाईंवर टीका करण्याचा उद्योग करतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं,वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. २५ वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांवर दोष देतोय, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली.
इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 27, 2025
या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला
यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे त्यांना चांगले ठाऊक असल्याने आता स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी ते अशी विवेकभ्रष्ट टीका करीत आहेत. उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला आहे. एकवेळ अशी येईल की, मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही. दरम्यान यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे.
