Maharashtra Flood : पंचांग पाहणार का….ठाकरे संतापले, शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 3 मोठ्या मागण्या!
उद्धव ठाकरे सध्या धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते शेतीची पाहणी करत आहेत. त्यांनी सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत. सरकारचा सातबारा कोरा करावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

Uddhav Thackeray Dharashiv Visit : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (25 सप्टेंबर) धाराशीवच्या दौऱ्यावर आहेत. धारावशीमधील गावांना भेट देऊन ते पावसामुळे झालेल्या नुकसानीची (Maharashtra Flood) पाहणी करत आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक शेतकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडत आहेत. तसेच आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे, अशी मागणी करत आहेत. उद्धव ठाकरे शेतीपिकाचे किती नुकसान झाले आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. दरम्यान, या पाहणीदरम्यान त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. खचून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपण सरकारला मदत करायला सांगू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफी करा अशी मोठी मागणीही यावेली त्यांनी केली आहे.
योग्य वेळ येण्यासाठी पंचांग पाहणार आहात का?
यावेळी बोलताना, पावसात फक्त शेतीच नव्हे तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले आहे. दरवेळेला योग्य वेळेला मदत करू असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र आता योग्य वेळ कधी येणार. ही योग्य वेळ येण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. तसेच आम्ही एक प्रयत्न केला होता. तसाच प्रयत्न करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी महत्त्वाची मागणी ठाकरे यांनी केली.
हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे ही आमची पहिली मागणी आहे. मी मध्येमध्ये शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्याकडून निवेदने घेतली आहेत. सरकाराने काय मदत केली हा वेगळा भाग आहे. पण शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये मिळाले पाहिजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अशी दुसरी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे
या पुरात शेतीचं फक्त नुकसानच झालेलं नाही. जमीनच खरडून गेली आहे. ही जमीन पुन्हा नीट करायला तीन ते पाच हजार वर्षे लागणार आहेत. आज सरकारने अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त साडे आठ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे पीक सडून गेले आहे. शेत साफ करण्याचा खर्च, कर्जाचा खर्च फार आहे. जमिनीची वाताहत झाली आहे, ती नीट करण्याचा खर्च आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की…
सरकारने पीकविम्याचे निकष बदलले आहेत. पीकमिव्याची पूर्ण रक्कम आताच मिळाली पाहिजे. पीकविम्याची रक्कम आताच मिळत नसेल तर विम्याचे थोतांड कशाला हवे, असे म्हणत पीकविम्याची रक्कम सरकारने तत्काळ द्यावी, अशीही मागणी ठाकरेंनी केली. आज माझ्या हतात काहीही नाही. मी फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलो आहे. बार्शीमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. त्याच्यावर 20 लाखांचं कर्ज आहे. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की वेडंवाकडं पाऊल उचलू नका. वाईट दिवस जातील, असे म्हणते त्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून नये असे आवाहन केले.
सरकारी अधिकारी आडमुठेपणाने वागत असतील तर…
वाईट दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. मदत देताना वेडेवाकडे निकष लावले जात असतील आणि सरकारी अधिकारी आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना आपल्याला सरळ करावे लागेल, असे सांगत पंचनामे करताना निकषांना बाजूला ठेवून मदत करावी, अशी भूमिका यावेळी ठाकरेंनी घेतली. बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिशी आल्या आहेत. या सर्व नोटिशी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठवू. हे कर्ज सरकारने भरावे असे आपण त्यांना सांगू, असे सांगत शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने फेडावे असेही आवाहन त्यांनी सरकारला केले.
