दगाबाज रे…; उद्धव ठाकरे थेट बांधावर, महायुती सरकारला जाब विचारणार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय दौरा सुरू केला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारला त्यांनी 'दगाबाज' संबोधून ३१ हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले, असा सवाल केला.

सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आजपासून ५ नोव्हेंबर रोजी सलग चार दिवसांच्या वादळी दौऱ्याला सुरुवात केली आहे. महायुतीतील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दगाबाज रे या शब्दात थेट आव्हान दिले आहे. सरकारने घोषित केलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले, शेतकऱ्यांपर्यंत खरंच किती रक्कम पोहोचली आणि जूनमध्ये कर्जमाफीनंतर आता अतिवृष्टीमुळे कर्जाचे हप्ते कोण फेडणार, असे प्रश्नही ठाकरे गटाने केला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा संवाद दौरा असणार आहे.
या पॅकेजचे काय झाले?
उद्धव ठाकरे आजपासून चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून मराठवाड्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून महायुती सरकारवर थेट टीका करण्यात आली आहे. या बॅनरवर दगाबाज रे अशा शब्दातून टीका करण्यात आली आहे. तसेच या पॅकेजचे काय झाले? असा सवालही विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे प्रतीकात्मक फोटो लावण्यात आले आहे. या बॅनरद्वारे शिवसेना ठाकरे गटाने महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील परिस्थिती आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. आश्वासन देऊन फसवणूक करणारे हे सरकार शेतकऱ्यांसाठी ‘दगाबाज’ ठरले आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच जाहीर झालेले हजारो कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई म्हणून केवळ ५ रुपये, १० रुपये किंवा ५० रुपये जमा झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा प्रकार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्याचे कर्जाचे हप्ते कोण फेडणार
शेतकऱ्यांचे पीक मातीमोल झाले आहे, त्यांच्यासमोर जगायचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जूनपर्यंत कर्जमाफीची वाट पाहण्याऐवजी सरकारने त्वरित कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचे सध्याचे कर्जाचे हप्ते कोण फेडणार, याचे उत्तर द्यावे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
