…हे सरकारही उद्या जाणार, हा स्वर्गासारखा देश… उद्धव ठाकरे कडाडले!
खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तका मुंबईतील प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी तुफाणी भाषण केलं. आपल्या खास शैलीत त्यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार फटके बाजी केली.

Uddhav Thackeary : खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तका मुंबईतील प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी तुफाणी भाषण केलं. आपल्या खास शैलीत त्यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार फटके बाजी केली. विशेष म्हणजे राऊतांच्या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी सध्याचं राज्यातलं सरकार उद्या जाणारच आहे, असं ठणकावून सांगितलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आपण असंख्य लढाया लढलो आहोत. यापुढेही लढायाच्या आहेत. संजयचं पुस्तक वाचून लोकांच्या मनातील तुरुंगाची भीती निघून जाईल. या पुस्तकातील घुशी आणि सशांचे उल्लेख वाचून आपल्याला बरं वाटतं. पण तुरुंगात यातना भोगताना काय वाटलं असेल? संजय तू या पुस्तकाने लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राऊतांचे कौतुक केले.
…हेही सरकार उद्या जाणार- उद्धव ठाकरे
तसेच, सरकारं येतात आणि जातात. हे सरकारही उद्या जाणार आहे. किंबहूना आपल्याला ते घालावावच लागेल, अशी गर्जनाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कुणाला काय व्हायचं म्हणून नाही तर यांनी हा स्वर्गासारखा देश नरक केला. त्यासाठी या लोकांना घालवण्यासाठी आपल्याला लढावंच लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधानांचं विमान जातं म्हणून इतरांची विमाने…
उद्धव ठाकरे यांनी देशातील हुकूमशाही कारभारावर जोरदार आसूड ओढले. आता वन नेशन, वन इलेक्शनचं सुरू आहे. असं असेल तर सर्वांना समान पातळीवर आणा. पंतप्रधान हा देशाचा असतो. त्यांनीही पंतप्रधान म्हणून कोण्या एका पक्षाचा प्रचार करू नये. एकाच पक्षाच्या प्रचाराची गरज नाही. निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांचं विमान जातं म्हणून इतरांची विमाने उडू दिली नाहीत. पंतप्रधानांच्या सभा चालतात. मग इतरांच्या झाल्या नाही तरी चालतील. हे असं कसं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आम्हाला दुश्मन का समजता?
अमित शाह आम्हाला कशासाठी दुश्मन समजता? तुमचे आणि आमचे मतभेद आहेत. तुमचं बुरसटेललं हिंदुत्व आहे. आमचं राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे. तुम्ही आम्हाला पाकिस्तानपेक्षा आधी खत्म करायचं बघत आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
तरीही शिवसेना सत्तेत आली
तुम्ही शिवसेनेला संपवायला निघाला. हा पहिला प्रसंग नाही. 1969 साली शिवसेनाप्रमुखांनाही तुरुंगात ठेवलं होतं. 100 दिवस शिवसेना प्रमुख तुरुंगात होते. मोरारजी देसाई तेव्हा उपपंतप्रधान होते. माहीम चर्चजवळून मोरारजी देसाई यांचा ताफा जाईल आणि त्यांना शिवसेना निवेदन देईल असं ठरलं होतं. मला आठवतंय. आमच्याकडे अम्बेसेडर कार होती. त्यात मी आणि माँ होतो. पण मोरारजींचा तोफा वेगात आला. त्यांनी अनेकांना उडवलं. त्यामुळे आंदोलन चिघळलं. तुफान राडा झाला. शिवसेनाप्रमुखांनी माँला सांगितलं बॅग भरून ठेवा. रात्री आम्हाला तुरुंगात ठेवतील. त्यानंतर पहाटे शिवसेनाप्रमुखांना अटक झाली. तीन महिने शिवसेनाप्रमुख आत होते. शिवसेना तीन महिने नेतृत्वहीन झाली होती. तरीही शिवसेना नंतर सत्तेत आली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.