Ujjwal Nikam : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्जवल निकम विशेष सरकारी वकील
Ujjwal Nikam : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि मागच्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी उज्जवल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे. उज्जवल निकम यांच्या नियुक्तीच, हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.
उज्ज्वल निकम यांनी 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे खटले यशस्वीरित्या लढवले आहेत. मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलेलं नाही. धनंजय देशमुख यांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.
नवनीत कावत यांचा निरोप काय?
केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत. मागण्या मान्य होत आहेत आंदोलन स्थगित करा हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निरोप वैभव पाटलांनी धनंजय देशमुख यांना दिला.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/CkHIgGNneF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025
मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या 7 प्रमुख मागण्या काय ?
1) केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा.
2) फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा.
3) याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा.
4) संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.
5) वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा.
6) आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून सहआरोपी करा.
7) घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटलांनी तो कोणाच्या सांगण्यावरून कळंबच्या दिशेने वळवला याची चौकशी करा.
