मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना पावसाने गाठले, मुंबईत सकाळी सकाळीच पावसाची हजेरी, राज्यातही अवकाळीचं धुमशना; अलर्ट कुठे कुठे?
काल पासून संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावलीआहे. मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडताना दिसत आहे.

संपूर्ण देशात मान्सूनने चांगलीच हजेरी लावली आहे. यंदा अपेक्षापेक्षा लवकर पाऊस सुरु झाला आहे. मुंबई परिसरात आज सकाळ पासून पडणाऱ्या पावसाने दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पाणी साचले आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकल्या गेलेल्या सर्वांना पावसाने गाठले आहे. आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शिवाजीपार्क मैदान खेळाडूंने गजबजलेले असते पण पावसामुळे आज पूर्ण मैदानात शुकशुकाट आहे. मैदानात सर्वत्र पाणी साचलेले आहे.
नरिमन पॉईंट येथील रिमझिम पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर जमा झाले आहेत. हवामानात गारवा निर्माण झाला असून पावसाचा आनंद घेण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात समुद्रकिनारी अनेक मुंबईकर भिजत, सेल्फी घेत, आणि शांततेचा अनुभव घेताना दिसून येत आहेत. तर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मुंबईकरांनीही पावसाचा अनुभव घेतला.राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत तापमानात घट झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांची या पावसामुळे उकाड्यातून मुक्तता झाली असली, तरी शेतकरी मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे चिंतेत पडला आहे. जर या महिन्यात पाऊस पडला आणि पेरणीच्या वेळी जर पावसाने दगा दिला, तर शेतकरी संकटात सापडू शकतो. वाचा: रिसॉर्ट बुकींग ते डब्बा पुरवणे, काँग्रेसच्या ‘या’ माजी मत्र्यांच्या मुलानेच केली हगवणेची मदत
जालना येथील भोकरदन तालुक्यात आज पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सोयगाव देवी कुंभारी गारखेडा बेलोरा वालसा आणि आसपासच्या परिसरात पहाटे आठ वाजेच्या सुमारास आलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आला आणि हे पाणी पुलाच्या वरून वाहत असल्याचं दिसून आलं. दरम्यान मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान सुरू होत असल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडले असल्यामुळे शेतकरी सद्यस्थितीला हैराण झाले आहेत.
तळकोकणात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे सिंधुदुर्गात चार दिवसांपासून सूर्यदर्शन देखील झालेले नाही. चार दिवसापूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातले होते.
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा म्हणजेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
