रिसॉर्ट बुकींग ते डब्बा पुरवणे; काँग्रेसच्या ‘या’ माजी मत्र्यांच्या मुलानेच केली हगवणेची मदत
Vaishnavi Hagawane Death: सध्या चर्चेत असणारे वैष्णवी हगवणे प्रकरणात सतत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात राजेंद्र हगवणे यांना काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलानेच मदत केल्याचे समोर आले.

वैष्णवी हगवणेने तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी, अनिल कस्पटे यांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. त्यांनी गेल्या 7 दिवसांमध्ये वेगवेगळी ठिकाणे बदलली आहेत. दरम्यान, त्यांना एका काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलाने मदत केल्याचे सोमर आले आहे.
कोणी बुक केलं रिसॉर्ट?
राजेंद्र हगवणे फरार असलेल्या 7 दिवसांपैकी एक दिवस महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्टमध्ये राहिले होते. राजेंद्रसोबत आणि दोन साथीदार होते. या रिसॉर्टचं बुकींग कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या निमित्ताने माझे गेस्ट येणार आहेत, म्हणून प्रीतम पाटील यांनी हेरिटेज रिसॉर्टमधील दोन रूम बुक केल्या होत्या. हे गेस्ट राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार होते. वाचा: वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची ‘करिश्मा’ आहे तरी कोण?
कधी गेले होते रिसॉर्टवर?
राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार होता. 19 तारखेच्या मध्यरात्री पासून तो साथीदारांसोबत हेरिटेज रिसॉर्टवर थांबला. त्यानंतर 21 तारखेला तो तेथून निघाला. दिवसभर तो रिसॉर्टवर थांबत नसे. केवळी रात्री झोपण्याच्या वेळी तो रिसॉर्टवर यायचा. तसेच या रिसॉर्टवर जेवण घेऊन प्रीतम पाटील येत असल्याचे समोर आले आहे.
राजेंद्र हगवणेचे कर्नाटक कनेक्शन काय?
राजेंद्र हगवणेचे कर्नाटकातील काँग्रेस कनेक्शन समोर आले आहेत. काँग्रेसच्या माजी मंत्राच्या मुलाने राजेंद्र हगवणेला आसरा दिला होता. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलाने हेरिटेज रिसॉर्ट बुक केल्याची माहिती समोर आली. राजेंद्र हगवणे आणि प्रीतम पाटील यांची घोडे पाळण्यातून मैत्री झाली होती. अनेकदा त्यांच्या भेटीगाठी होत असत असे म्हटले जाते.