ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावतात ? प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. हे अकोला येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावतात?, असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाय योजनांना परवानगी देऊ शकत नाही. आणि पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, असा नियम सांगत असल्याचे आंबेडकर म्हणाले. सरकारचे सर्वेक्षण आणि इतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसतांना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?,असा सवाल त्यांनी केला.
तसेच सातबारा कोरा करण्याच्या राजकीय पक्षांच्या मागणीवरही त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असतांना काय केलं?, असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणाचीही स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली असल्याचं ते म्हणाले. महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणतीही हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी एकत्र येण्यात काहीच अडचण नाही
तर जसे ठाकरे बंधू एकत्र आले तसेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याच्या आनंद आंबेडकरांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणतीही अडचण नाही. या प्रक्रियेतील काही गोष्टी कौटुंबिक पातळीवर झालेल्या चर्चेतील आहेत, असे सांगत त्यांनी त्या उघड करण्यास नकार दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी मतचोरीच्या मुद्याचा बॉम्ब फोडल्यावर, मतचोरीच्याच नव्हे तर सर्वच मुद्द्यावर राहुल गांधींसोबत एकत्र यायला हरकत नसल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. मतचोरीच नव्हे तर मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी एकत्र येण्यात काहीच अडचण नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; हेक्टरी ५० हजार रु. मदतीची मागणी, प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर जनावरांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची दिवाळी घरात येणारे पीक वाहून गेल्याने त्यांचे स्वप्नही उद्ध्वस्त झाले असल्याचे वंचित बहुजन आघाडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 2200 कोटींची मदत तुटपुंजी राज्य सरकारने घोषित केलेली 2200 कोटी रुपयांची मदत ही या अभूतपूर्व संकटाच्या तुलनेत अतिशय तुटपुंजी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) माध्यमातून शेतकऱ्यांकडून करोडो रुपयांचा सेस (Cess) वसूल केला जातो, तो आणि राज्याच्या सकल उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा 12% वाटा अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला का येत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, शासनाने ही मदत कोणत्या दराने दिली, हेदेखील स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या : १. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे. २. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देणे.
3. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. ४. या संकटसमयी सरकारने तातडीने आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. उद्योजकांना मदत मग शेतकऱ्यांना ‘पंचनामे’ कशासाठी?
मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करताना किंवा त्यांना मदत देताना सरकार कोणतेही सर्व्हे किंवा पंचनामे करत नाही, मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच हे सोपस्कार का लावले जातात, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने सरकारला विचारला आहे.
