मोठी बातमी! निकालापूर्वीच पेढे, कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष, राज्यातील बड्या महापालिकेत मोठा उलटफेर, विजयी पताका फडकवली
मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली असून, घडामोडींना वेग आला आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. राज्यातील 29 महापालिकेंची मुदत संपल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानं सर्वच पक्षांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेचा विषय ठरल्या आहेत. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. परंतु काही ठिकाणी युती आणि आघाडीच्या गणितामुळे निष्ठावतांना संधी न मिळाल्यानं नाराजीचं वातावरण देखील आहे, तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून अनेकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात देखील प्रवेश केला. काही ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार उपोषणाला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे. या बंडखोरीचा सर्वच पक्षांना कमी -अधिक प्रमाणात या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो.
दरम्यान निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर होती. दरम्यान आता 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली असून, मालेगावातून मोठी बातमी समोर आली आहे. मालेगावात इस्लाम पार्टीने खातं उघडलं आहे.
प्रभाग क्रमांक 06 (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड झाली आहे. समोरच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांचा बिनविरोध विजय झाला आहे. मालेगावात इस्लाम पार्टीचा हा पहिलाच बिनविरोध विजय ठरला आहे. या विजयानंतर इस्लाम पार्टीचे अध्यक्ष, माजी आमदार आसिफ शेख यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.
“मालेगाव मनपात आमच्याच इस्लाम पार्टीचे बहुमत येईल, पूर्ण बहुमताने आमचाच महापौर असेल,” असा दावा यावेळी इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी केला आहे. “AIMIM च्या आमदारांनी आतापर्यंत लोकांना फसवून मतदान मिळवले आहे,” असा घणाघातही यावेळी शेख यांनी केला आहे. दरम्यान मालेगाव महापालिका निवडणुकीत मिळालेला हा पहिला विजय या पक्षासाठी मोठं यश मानलं जात आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
