आता ग्रामस्थांना भूकंप, वादळातही तग धरणारी घरे मिळणार; आयआयटीच्या मदतीने घर बांधणी; मुश्रीफांची मोठी घोषणा

ग्रामीण भागात भूकंप, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करु शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी आयआयटीची (मुंबई) मदत घेतली जाणार, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली (Minister Hasan Mushrif big announcement about Gharkul scheme).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:11 PM, 23 Feb 2021
आता ग्रामस्थांना भूकंप, वादळातही तग धरणारी घरे मिळणार; आयआयटीच्या मदतीने घर बांधणी; मुश्रीफांची मोठी घोषणा

मुंबई : ग्रामीण भागात भूकंप, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करु शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी आयआयटीची (मुंबई) मदत घेतली जाणार, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार अशा घरकुलाचे तंत्रज्ञान विकसीत करणे तसेच नैसर्गिक आपत्तींचा सामना करु शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी आयआयटी (मुंबई) यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं (Minister Hasan Mushrif big announcement about Gharkul scheme).

“आयआयटीच्या सहयोगातून राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंटरर्नशीपच्या माध्यमातून आयआयटीमधील विद्यार्थ्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये सहभाग घेतला जाणार आहे. आयआयटी ही देशातील अग्रगण्य आणि नामांकीत संस्था असून त्यांच्या सहयोगातून ग्रामीण भागातील घरकुले अधिक दर्जेदार होण्यास मदत होईल”, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

हुडको करणार सीएसआरच्या माध्यमातून सहकार्य

“या योजनेसाठी हुडको (हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माणासाठी तांत्रिक सहकार्य तसेच सीएसआर आदी माध्यमातून आर्थिक सहकार्य घेण्यात येणार आहे. मोठ्या गावांमध्ये बहुमजली इमारती तसेच हाऊसिंग कॉलनी आदींमध्ये सीएसआरच्या माध्यमातून मुलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी हुडको सहकार्य करेल. तसेच कमी खर्चातील घरकुलाचे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठीही हुडको सहकार्य करणार आहे”, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली (Minister Hasan Mushrif big announcement about Gharkul scheme).

रिलायन्स फाऊंडेशनमार्फत माहिती प्रसारणासाठी होणार मदत

“घरकुलविषयक विविध योजनांची माहिती संबंधीत अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थ्यांपर्यंत ऑडीओ, व्हीडीओ तसेच टेक्स्ट मेसेजद्वारा पोहोचविण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण घरकुल योजनांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईनही तयार करण्यात येणार आहे. या सर्वांच्या सहभागातून राज्यातील ग्रामीण भागातील घरकुलांचे उद्दीष्ट लवकरच पूर्ण होईल”, असंदेखील त्यांनी सांगितले.

महाआवास अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

राज्यात 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील 3 लाख 37 हजार 978 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 98 हजार 97 लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 85 हजार 30 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरीत घरकुले 31 मार्चपर्यंत पूर्ण करुन “मिशन झीरो” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाआवास अभियानास 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

‘हे एक प्रकारचे सामाजिक कार्य’

मुश्रीफ म्हणाले, घरकुलविषयक सर्व योजना ह्या ग्रामीण भागातील गरीब, बेघर यांना दिलासा देणाऱ्या आणि घरकुलाचे त्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या महत्वाच्या योजना आहेत. या योजनांसाठी काम करणे हे एक प्रकारचे सामाजिक कार्य आहे. त्यामुळे घरकुलविषयक सर्व योजनांची जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण गरीब, बेघरांना घरे उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘राज्यात 74 हजार 373 पात्र लाभार्थ्यांना घरकुले बांधता आली नाहीत’

“जागा उपलब्ध नसल्यामुळे राज्यात 74 हजार 373 पात्र लाभार्थ्यांना घरकुले बांधता आली नाहीत. या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. गायरान तसेच शेती महामंडळाच्या जागा घरकुल बांधकामांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण महसूल मंत्र्यांशी बोलून प्रयत्न करणार आहोत”, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

हेही वाचा : Video | संजय राठोड यांच्याविरोधात निदर्शने, काळे झेंडे दाखवून कारवाईची मागणी