देगाव शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गानं प्रशासन सतर्क, आतापर्यंत 3 वेळा आरोग्य तपासणी

आरोग्य यंत्रणेला काळजी टाकणाऱ्या वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेत आतापर्यंत तीन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आलीय.

  • विठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम
  • Published On - 22:14 PM, 26 Feb 2021
देगाव शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गानं प्रशासन सतर्क, आतापर्यंत 3 वेळा आरोग्य तपासणी
प्रातिनिधिक फोटो

वाशिम : आरोग्य यंत्रणेला काळजी टाकणाऱ्या वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेत आतापर्यंत तीन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आलीय. देगाव शाळेच्या वसतिगृहात 24 फेब्रुवारी रोजी 229 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात. सध्या बाधित सर्व 229 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज (26 फेब्रुवारी) पुन्हा शाळेला भेट देवून येथील आरोग्य सुविधांची पाहणी केली (Washim Corona Updates Medical check up of students of Degaon School).

देगाव शाळेतील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून दिवसातून तीन वेळा आरोग्य तपासणी केली जात आहे. या शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कोरोना बाधा झाल्यानंतर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने शाळेला भेट देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच या विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी 2 डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके 24 तास शाळेमध्ये तैनात करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. त्याचबरोबर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

यानंतर आरोग्य विभागाने तातडीने या सूचनांची अंमलबजावणी करून या शाळेमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या शाळेचे तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. येथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी पुन्हा शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सद्यस्थिती जाणून घेतली.

व्हिडीओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद

बाधित आढळलेले विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील 151, यवतमाळ जिल्ह्यातील 55, बुलडाणा जिल्ह्यातील 3, अकोला जिल्ह्यातील 1, हिंगोली जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश होता. संबंधित जिल्हा प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यापूर्वीच पाठविण्यात आलीय. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गावातील तलाठी, ग्रामसेवक यांचे सहाय्य घेवून विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जात आहे. त्यामुळे पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत असलेला संभ्रम, भीती दूर होण्यास मदत होणार आहे. या भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा :

पोहरादेवीमध्ये संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

Washim Corona Updates : पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

Washim Corona Updates : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोना, प्रशासन खडबडून जागं

व्हिडीओ पाहा :

Washim Corona Updates Medical check up of students of Degaon School