weather update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील 24 तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
पावसासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख ( Weather expert Punjabrao Dak) यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे.

राज्यात पावसाने चिंता वाढवली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसच झाला नसल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जलसाठे धोक्यात आले आहेत. पिकं सुकली आहेत. राज्यात वरुणराजा कधी हजेरी लावणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात कमी दबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भापासून पावसाला सुरुवात होणार असून, त्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस जोर पकडणार आहे. या संदर्भात आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.
काय आहे पंजाबराव डख यांचा नवा अंदाज?
महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पूर्व विदर्भाकडून पश्चिम विदर्भाकडे आणि पश्चिम विदर्भाकडून मराठवाडा आणि मराठवाड्याकडून उत्तर महाराष्ट्राकडे जात आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस शेतातील पिकांसाठी जीवदान ठरणार आहे. राज्यामध्ये 11 सप्टेंबर रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 11 तारखेला चांगला पाऊस होणार आहे. त्यानंतर बारा सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर रोजी हा पाऊस पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ कव्हर करणार आहे. त्यानंतर या पावसाची मराठवाड्यात एन्ट्री होणार आहे. 13, 14 आणि 15 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा चांगला जोर राहणार असून, मराठवाड्यातून हा पाऊस उत्तर महाराष्ट्र आणि पुढे मुंबईत प्रवेश करणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पडणार आहे.
25 राज्यांना पावसाच हाय अलर्ट
दरम्यान 11 सप्टेंबर रोजी 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून (IMD) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, झारखंड, अरुणाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मेघालय, मिझोरम या राज्यांचा समावेश आहे.
