Weather Updates : वादळामुळे खवळणार समुद्र, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबईत मोठा निर्णय, अपडेट्स काय ?
Weather Update : मोंथा वादळामुळे अरबी समुद्रातील हवामान बदलले असून, कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईत समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने मांडवा-गेटवे ऑफ इंडिया सेवा स्थगित झाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलामुळे वातावरणात मोठा बदल दिसत आहे. मोंथा वादळामुळे कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्र खवळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मांडवा–गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे हवामान अस्थिर असून सुरक्षिततेच्या कारणास्तव ही खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू असून दिवाळीचा सणही पावसातच गेला. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता मोंथा वादळामुळे परिस्थिती पुन्हा बदलली असून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणकिनारी दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मोठा निर्णय
मोंथा वादळामुळे मुंबईतील समुद्र खवळण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर मांडवा–गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने हा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, ‘मालदार कॅप्टन’ ही बोट मात्र तात्पुरती सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर सर्व बोटी बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या तीन नंबरच्या इशाऱ्यानंतर अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील सर्व मच्छिमारांनी बोटी किनाऱ्यावरच ठेवल्या आहेत.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणातील पाऊस वाढला असून याचा फटका काजू बागांना बसत आहे. सततच्या पावसामुळे काजूच्या झाडांवर बुरशीजन्य रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही भागांत काजू मोहोर गळून पडला असून झाडे सुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने नागरिकांना आणि मच्छिमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
चिपळूणमध्ये जोरदार पाऊस सुरूच, शेतकरी हवालदिल
चिपळूणमध्ये रात्रीपासून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतात पाणी साठलं म्हणून शेतकऱ्यांनी काही ठिकाणी रस्त्यावरती कापलेलं भात पीक वाळवायला ठेवलं होतं. मात्र रात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि अजूनही पावसाची संततदार सुरू आहे. यामुळे चिपळूण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. भात पीक वाचवता येणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. कापून ठेवलेला भात ओला होऊन कुसायला सुरुवात झाली असून भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक वाचवणं हे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान बनलं आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी सरकारकडे मागणी केली आहे.
